
चित्रपट महामंडळ निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या आरोपांवर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याच्या आरोपांवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत, “या निवडणुकीशी माझा कोणताही संबंध नसून विनाकारण माझी बदनामी केली जात आहे,” असे स्पष्ट केले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सध्या चर्चेत असून, तब्बल दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे. यंदाच्या निवडणुकीत सुमारे ६० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. दरम्यान, निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आरोप काही सदस्यांनी केले होते.
अभिनेते विजय पाटकर यांनी एका मंत्र्याच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केल्यानंतर उदय सामंत यांचे नाव चर्चेत आले होते. यावर स्पष्टीकरण देताना सामंत म्हणाले की, “गेल्या दोन दिवसांपासून माझे नाव या निवडणुकीशी जोडले जात आहे. माझा पीए निवडणुकीत सहभागी होता किंवा मी वांद्र्यात गेलो होतो, अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासून पाहावी.”
ते पुढे म्हणाले, “ही निवडणूक तीन वर्षांपूर्वी सदस्यत्वासाठी अर्ज केलेल्या सदस्यांची प्रक्रिया आहे. या निवडणूक प्रक्रियेशी माझा कोणताही संबंध नाही. विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर या आरोपांमागे नेमके कोण आहेत, हे मी जाहीर करेन.”




