जनगणनेच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा; राजापूर प्रशासनाचे नागरिकांना आवाहन


राजापूर शहरात सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. जनगणनेच्या नावाखाली बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा वैयक्तिक तपशील मागणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन राजापूर नगरपालिका प्रशासनाने केले आहे.

देशभरात एप्रिल २०२६ पासून जनगणना प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली असून राजापूर शहरातही घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम सुरू आहे. या प्रक्रियेसाठी २२ प्रगणक आणि ४ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून सरकारी शाळा व हायस्कूलमधील शिक्षकांचाही सहभाग आहे. राजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिनित गुंगोरे हे या मोहिमेचे चार्ज ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अधिकृत प्रगणक नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची बँक खात्याची माहिती, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, पिन, सीव्हीव्ही किंवा ओटीपी विचारणार नाहीत. सर्व प्रगणकांकडे भारत सरकारच्या Registrar General & Census Commissioner India यांचे अधिकृत ओळखपत्र असणार असून डिजिटल जनगणनेअंतर्गत क्यूआर कोड स्कॅन करून त्यांची ओळख पडताळून पाहता येणार आहे.

जनगणना प्रक्रियेदरम्यान कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय तसेच घरातील पाणी, वीज आणि शौचालयासारख्या मूलभूत सुविधांबाबत एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ तहसील कार्यालय किंवा नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वतः माहिती भरल्यास त्यांना ११ अंकी SE ID मिळणार असून त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. तसेच कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीने १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button