
गगनबावड्यात भरधाव ट्रकचा कहर; दुचाकीस्वार ठार, सात वाहनांचे नुकसान
तळकोकणातून करूळ घाटमार्गे कोल्हापूरकडे बिडाचे गोळे भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने उडविल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अकिल रमजान थोडगे (वय 20 वर्षे) रा.कातळी ता.गगनबावडा असे मयत तरुणाचे नाव आहे.या अपघातात रोडवरील अन्य सहा वाहने, इमारतींना धडक दिल्याने मोठे नुकसान तर दोन गायींचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली असून सोमवारी पहाटेच्या सुमारास गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
तळकोकणातून करूळ घाटमार्गे कोल्हापूर सांगलीकडे निघालेला ट्रक गगनबावडा येथे आला असता ट्रकचालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने भक्तनिवास इमारतीजवळ दुचाकीवर थांबलेल्या तरुणाला वेगाने धडक दिली. त्यात तो तरुण काही फुट पुढे जाऊन पडला. यात अकिल थोडगे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रक पुढे नेत असताना या ट्रकने गगनबावड्यातील मुख्य चौकात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रक, एक मिनी ट्रॅव्हल्स व एका चार चाकीला पाठीमागून धडक दिली. पुढे तो ट्रक रस्त्याकडेला असलेल्या दुकानात घुसला. यात योगीता अनिल चव्हाण ही महिला जखमी झाली. वेगाने धडक दिल्याने दोन गायींचाही यात मृत्यू झाला आहे. या अपघातात सात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमीवर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ट्रकचालक विजय बापू शिंदे (वय २३ वर्षे) शेगाव, ता.जत यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गगनबावडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
केवळ दैव बलवत्तर म्हणून …
सदानंद पवार हे आपल्या दोन मित्रांसमवेत तळकोकणातून लातूरकडे चारचाकीने निघाले होते. गगनबावडा येथे बाथरुमसाठी थांबले होते. काही क्षणात या ट्रकने त्यांच्या रिकाम्या चारचाकीला मागून जोरदार धडक दिली त्यामुळे त्यांची कार पुढे उभ्या असलेल्या ट्रकच्या मागे घुसली यात या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणीही गाडीत नव्हते म्हणून अनर्थ टळला




