
’स्वच्छता ऍप’ला तांत्रिक अडचणींच
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी भागातील अस्वच्छतेचे निवारण करण्यासाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेले ’स्वच्छता ऍप’ रत्नागिरी शहरात कार्यान्वित असले तरी त्याच्या वापराबाबत आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नगरपरिषदेने या ऍ पद्वारे प्राप्त होणार्या तक्रारींची दखल घेण्यात तत्परता दाखवली असली तरी तांत्रिक अडचणींमुळे हे व्यासपीठ नागरिकांसाठी पूर्णपणे सुलभ ठरत नसल्याचे दिसून येत आहे.
हे ऍप पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून त्याची कार्यपद्धती अत्यंत पारदर्शक आहे. नागरिकाला शहरात कुठेही कचर्याचा ढीग, रस्त्यावरील अस्वच्छता किंवा सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था दिसल्यास, त्याला ऍपच्या माध्यमातून थेट त्या जागेचा फोटो काढावा लागतो. फोटो काढताना हे ऍप ’जिओ-टॅगिंग’ प्रणालीचा वापर करून त्या ठिकाणचे अचूक भौगोलिक स्थान म्हणजेच जीपीएस लोकेशन आपोआप नोंदवून घेते. यामुळे संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षकाला कचरा नेमका कुठे आहे, हे शोधणे सोपे जाते.
’स्वच्छता ऍप’वर तक्रार दाखल होताच ती थेट स्थानिक प्रशासनाच्या स्वच्छता विभागाकडे वर्ग केली जाते. विशेष म्हणजे, प्रशासनाने ती जागा साफ केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेचा फोटो पुरावा म्हणून परत अपलोड करणे बंधनकारक असते. त्यानंतरच तक्रारीचे निवारण झाल्याचे मानले जाते.
८९ पैकी ८७ तक्रारींचा निपटारा रत्नागिरी नगरपरिषदेने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारीपासून आजवर या ऍपच्या माध्यमातून एकूण ८९ तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने या तक्रारींकडे गांभीर्याने पाहत त्यापैकी ८७ तक्रारींचा यशस्वी निपटारा केला आहे.
मुख्याधिकारी वैभव गारवे म्हणाले, प्राप्त होणार्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागामार्फत स्वच्छता करून घेण्यावर भर दिला जात आहे. नगरपरिषदेचा हा प्रतिसाद पाहता प्रशासकीय स्तरावर तक्रार निवारणाचा दर उच्च असल्याचे समाधानकारक चित्र समोर आले आहे.www.konkantoday.com




