
मुंबई गोवा महामार्गावर होत आहेत वारंवार अपघात, प्रशासन ढिम्मटँकर-दुचाकी धडकेत चिमुरडीपाठोपाठ वडिलांची मृत्यू; आई गंभीर
मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथे रविवारी रात्री काळोखात टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आग्रे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. होमगार्ड असलेले कुणाल आग्रे आपली पत्नी आणि चार वर्षांच्या चिमुकली गार्गीसोबत घरी परतत असताना मागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या गाडीचा चुराडा केला. धडक इतकी भीषण होती की ४ वर्षांची गार्गी जागीच ठार झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाप-लेकीला पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. गंभीर जखमी कुणाल आग्रेंनी रुग्णालयात नेताच अखेरचा श्वास घेतला. या अपघाताने एका क्षणात हसते-खेळते कुटुंब संपले. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी कुणाल आग्रे यांच्या पत्नी डेरवण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
या हृदयद्रावक घटनेनंतर वालोपे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. “आता किती बळी घेणार?” असा सवाल करत शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. मुंबई-गोवा महामार्गावर “रास्ता रोको” करत महामार्ग पूर्ण ठप्प केला. दोन्ही बाजूला ५ ते ६ किमी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी प्रवासी ताटकळले, अनेकांची गैरसोय झाली. पण असंतोषाचा उद्रेक झाला होता. गावकऱ्यांचा आक्रोश थांबत नव्हता.
“वारंवार अपघात होतात, प्रशासन झोपले आहेका? स्पीडब्रेकर नाही, दुभाजक नाही, सुरक्षेचे नाव नाही. आमच्या लेकरांचे जीव स्वस्त आहेत का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला. अखेर अडीच तासांनी पोलिसांनी समजूत काढून वाहतूक पूर्ववत सुरू केली. ग्रामस्थांनी पाठलाग करून टँकर चालकाला पकडला होता. त्याला चांगला प्रसादही देण्यात आला होता. चिपळूण पोलीस ठाण्यात टँकर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.




