
हळदीच्या सोहळ्यात रंगला साहित्यिक उत्सव!अदिती मयेकर यांच्या ‘काव्यादिती’ काव्यसंग्रहाचे अनोखे प्रकाशन
तालुक्यातील हर्चे येथे पार पडलेल्या एका विवाहसोहळ्यात साहित्य आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. लग्नघरातील मंगलमय वातावरण, सनईचे स्वर आणि हळदीच्या सोहळ्यातील उत्साह यामध्ये एक आगळावेगळा साहित्यिक क्षण उलगडला. नववधू अदिती अंजनी आनंदकुमार मयेकर यांच्या ‘काव्यादिती… कविता डायरीतल्या’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हळदी समारंभात मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान अचानक काव्यसंग्रह प्रकाशनाची घोषणा होताच उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. हळदीने नटलेल्या अदिती यांच्या हातात त्यांच्या स्वतःच्या कवितांचे पुस्तक देण्यात आले. हा भावनिक क्षण अनुभवताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. उपस्थित नातेवाईक, ग्रामस्थ आणि साहित्यप्रेमींनी या अभिनव कल्पनेचे मनापासून स्वागत केले.
‘काव्यादिती’ हा अदिती मयेकर यांचा प्रथम काव्यसंग्रह असून, त्याचे प्रकाशन सोनचाफा प्रकाशन यांनी केले आहे. या संग्रहात नातेसंबंध, भावविश्व, स्वप्ने आणि जीवनातील विविध अनुभवांचे संवेदनशील शब्दचित्र रेखाटण्यात आले आहे.
या उपक्रमामागे डॉ. अनिकेत मयेकर यांचा विशेष पुढाकार होता. आपल्या बहिणीच्या साहित्यिक प्रवासाला व्यासपीठ मिळावे, या हेतूने त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. कौटुंबिक प्रेम आणि साहित्यिक जाणिवांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यु. बी. पाटील यांनी केले. यावेळी डॉ. स्मिता अविनाश मयेकर, महाविद्यालयीन प्राध्यापक, हर्चे गावचे ग्रामस्थ तसेच दोन्ही कुटुंबांतील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लग्नसोहळा, हळदीचा उत्सव आणि काव्यसंग्रह प्रकाशन असा दुर्मीळ योग अनुभवताना उपस्थितांनी हा क्षण अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली. ‘काव्यादिती’ हा काव्यसंग्रह रसिकांच्या मनात निश्चितच विशेष स्थान निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




