
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्रात पुण्याचा पर्यटक बेपत्ता
तारकर्ली येथे एमटीडीसीसमोरील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पुण्यातील दोन पर्यटकांपैकी समर्थ गणेश कर्पे (२२) हा तरुण गुरुवारी सायंकाळी बुडून बेपत्ता झाला. त्याचा मित्र ऋषभ रविकिरण कदम याला स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत सुखरूप बाहेर काढले असून त्याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समर्थ आणि ऋषभ हे दोघे सिंधुदुर्गात कार्यालयीन कामानिमित्त आले होते. गुरुवारी दुपारी ते तारकर्ली समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता लाटांचा आणि पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. आरडाओरडा ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ समुद्रात धाव घेत ऋषभचा जीव वाचवला, मात्र समर्थ खोल पाण्यात वाहून गेला. स्थानिक तरुणांच्या धाडसी प्रयत्नांमुळे एका पर्यटकाचे प्राण वाचले.




