
अमेरिकेचे मोठे नुकसान! इराणविरोधातील युद्धात गमावली ४२ लढाऊ विमाने अन् ड्रोन्स; अब्जावधी डॉलर्सचा फटका!!
इराणचे हवाई दल, नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेला देखील या संघर्षात मोठा तोटा सहन करावा लागला आहे. इराणविरोधातील संघर्षात अमेरिकेने ४२ विमानं गमावली असून, यात लढाऊ विमानं आणि ड्रोन्सचा देखील समावेश आहे. अमेरिकेने इराणविरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु केल्यानंतर विमानं गमावली असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
अमेरिकेने ४२ विमानं गमावली?
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरु केली. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरात इराणने देखील अमेरिकाच्या आखाती देशातील तळांवर हल्ले केले. अमेरिकेने इराणच्या लष्कराचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला. दरम्यान, या संघर्षात अमेरिकेचे देखील मोठे नुकसान झाल्याचे आता काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार अमेरिकेने ४२ विमानं गमावली आहेत. दरम्यान, या संख्येत बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
कोणती विमानं गमावली?
काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या खालील विमानांचे नुकसान झाले आहे.
- एफ-१५ ई स्ट्राईक ईगल लढाई विमान – चार विमानं
- एक एफ ३५ ए लढाऊ विमान
- ए-१० थंडरबोल्ट २
- केसी-१३५ स्ट्राॅटोटँकर – एकूण सात
- ई-३ विमान एक
- एमसी -१३० जे – २ विमानं
- एचएच -६० डब्ल्यु – १
- तसेच एमक्यू -९ – २४ ड्रोन आणि
- एमक्यू – ४ सी – एक ड्रोन
अमेरिकेला आर्थिक फटका
काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिस अमेरिकन काँग्रेस आणि समित्यांना धोरणात्मक आणि कायदेशीर विश्लेषण सेवा प्रदान करते. सीआरएसने, संरक्षण विभाग आणि अमेरिकन सेंट्रल कमांडच्या बातम्या आणि निवेदनांचा अभ्यास करून इराण विरोधातील संघर्षात झालेल्या नुकसानीची माहिती संकलित केली आहे. अमेरिकेला या संघर्षात नुकसानीबरोबर मोठा आर्थिक तोटा देखील झाल आहे. यामुळे अमेरिकेने संरक्षण खर्चात देखील मोठी वाढ केल्याची माहिती समोर आली आहे.
युद्धावर किती रुपये खर्च केले?
हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीची २९ एप्रिल रोजी सुनावणी पार पडली होती. यावेळी अमेरिकेने इराणविरोधातील युद्धावर २५ अब्ज डॉलर्स खर्च केल्याची माहिती देण्यात आली. हा खर्च प्रामुख्याने दारुगोळा आणि उपकरणांच्या देखभालीसाठी वापरण्यात आला होता, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. परंतु या युद्धाचा खर्च सुमारे २९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असल्याची माहिती पेंटागॉनचे सर्वोच्च अर्थसंकल्पीय अधिकारी ज्युल्स हर्स्ट यांनी काँग्रेसला दिली होती. ४ अब्ज डॉलर्सनी वाढलेला खर्च उपकरणांची दुरुस्ती, पार्ट बदली करणे यासह विविध गोष्टींवर खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.




