
ऑनलाइन फार्मसीविरोधात २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद; रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी
*रत्नागिरी, -‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ या संघटनेने देशात आणि राज्यात कार्यरत असलेल्या ऑनलाइन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या बुधवार दि. २० मे रोजी संपूर्ण देशभर किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांचा बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत तातडीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी औषधांची अत्यंत आवश्यकता भासल्यास रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी कार्यालयाच्या सहायक आयुक्त – औषधे शशिकांत यादव मो. नं. ९६५७६२७९२४, औषध निरीक्षक सो. प्र. वाढे – मो. नं. ७२१९५८१२४८ नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, आवश्यकतेनुसार प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त शशिकांत यादव यांनी केले आहे.
जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, व्यापक जनहित लक्षात घेता या नियोजित बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वैयक्तिक स्तरावरही विक्रेत्यांशी संपर्क साधला जात आहे.
*काही औषध दुकाने सुरू राहणार*
संपाच्या काळात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील काही औषध दुकाने सुरू राहतील, याची दक्षता घेण्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यांनीही यास संमती दर्शवली आहे.
’वेलनेस फॉरेव्हर’ आणि ‘मेडप्लस’ सुरू राहणार: रत्नागिरी जिल्ह्यातील वेलनेस फॉरेव्हर (Wellness Forever) आणि मेडप्लस केमिस्ट व ड्रगिस्ट (MedPlus) ही औषध दुकाने बंदच्या काळातही पूर्णवेळ सुरू राहणार आहेत.




