लोटे परशुराम येथील ‘पीफास’ रसायन उत्पादन वाद आता हरित लवादाकडे!


रत्नागिरी जिल्हयातील लोटे परशुराम एमआयडीसीत ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ या रासायनिक कारखान्याकडून तयार करण्यात येणारा अतिशय घातक ‘पीफास’ उत्पादन वाद आता राष्ट्रीय हरित लवादाकडे नेण्याचा निर्णय कोकण नागरी संर्घष समितीने घेतला आहे. राज्य सरकार, प्रदुषण नियंत्रण मंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून गेली तीन महिने प्रतिसाद न मिळाल्याने समितीने हरित लवादाचे दार ठोठवण्याचे ठरविले आहे. इटली मध्ये या घातक रसायन उत्पादनाला बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील लोटे परशुराम एमआयडीसीत लक्ष्मी ऑरगॅनिक नावाचा रासायनिक कारखाना जुलै २०२३ पासून विविध रसायनांचे उत्पादन घेत आहे. काही महिन्यापासून या कंपनीने ‘पीफास’ या अतिशय घातक रसायनाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून लोटे, खेड, घाणेकुट, धामणदेवी, सोनगाव, कोतवली, चिरणे या गावातील ग्रामस्थांनी या उत्पादनाला विरोध सुरु केला. त्यासाठी कोकण नागरी संर्घष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती स्थापन करण्यात आली.

या रासायनिक कारखान्यात १२० कामगार आहेत. त्यातील २० कामगार जवळच्या गावातील आहेत. त्यांना या कारखान्यात काय उत्पादन घेतले जाते, याची इंत्यभूत माहिती आहे. गेली तीन वर्षे उत्पादन घेण्यात आलेल्या रसायनाबद्दल ग्रामस्थांनी विरोध केला नाही मात्र ‘पीफास’ या घातक रसायनाचे उत्पादन सुरु झाल्यापासून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. हे उत्पादन बंद करा, यासाठी तीन महिन्यापेक्षा जास्त काळ (११३ दिवस) संर्घष समितीच्या वतीने कंपनीच्या समोर शांततामार्गाने आंदोलन सुरु आहे. मागील आठवडयात तीन ते चार हजार ग्रामस्थांचा सहभाग असलेला मोर्चा काढून सरकारच्या लक्ष वेधण्यात आले. पंचक्रोशितील १५ गावांचा ‘पीफास’ उत्पादनाला विरोध आहे.

या रसायनाच्या उत्पादनामुळे ग्रामस्थांच्या गळ्याभोवती मृत्यूचा फास आवळला आहे. नियमांना धरुन कारखाना सुरु आहे, असे राज्यकर्ते सांगतात. काही लोकप्रतिनिधींची कंत्राटे या कारखान्यात सुरु आहेत. आंदोलन चिरडण्यासाठी अनेक उपाय योजले जातात. समितीचे सदस्य दररोज तीव्र उष्णतेची लाट असताना धरणे आंदोलनात सहभागी होत आहेत. पीफास उत्पादनाने येथील जल, जमीन, जंगल, आरोग्य दुषित होत आहे. या रसायन उत्पादनाला जगातील २९ देशात बंदी आहे. या रसायनामुळे इटलीतील साडेचार हजार नागरीक बळी पडले आहेत. इटली, जर्मनीतील जनता ग्रामस्थांच्या या आंदोलनात दृकश्राव्य प्रणालीने सहभागी होत आहे. पीफासचे उत्पादन बंद करा, एवढीच मागणी येथील ग्रामस्थांची आहे. त्याकडे सरकार, आमदार, खासदार लक्ष देत नसल्याने आता हरित लवादाकडे दाद मागणार आहेत. – राजेंद्र गोपीनाथ आंब्रे, कोकण नागरी संर्घष समिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button