
दापोली ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी अनिल परबांसह सर्व आरोपी निर्दोष; पुराव्याअभावी न्यायालयाचा दिलासा!
गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात चर्चेत असलेल्या दापोलीतील ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणाचा अखेर निकाल लागला असून, खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या निर्णयामुळे दीर्घकाळ गाजलेल्या या प्रकरणावर पडदा पडला आहे.
या प्रकरणात माजी मंत्री परब यांच्यासह तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी तसेच मुरुड येथील तत्कालीन सरपंचांचा समावेश होता. आरोपींवर भारतीय दंड विधान अंतर्गत फसवणूक (कलम ४२०), गुन्हेगारी कट (१२०-ब), खोटी माहिती देणे (१७७, १८२) यांसह इतर कलमांखाली गुन्हे दाखल होते. याशिवाय भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गतही आरोप ठेवण्यात आले होते.
सरकारी पक्षाने न्यायालयात असा दावा केला होता की, संबंधित रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण नसतानाही कर आकारणी करून शासनाची फसवणूक करण्यात आली. तसेच खरेदीखतामध्ये इमारतीचा समावेश असूनही आवश्यक स्टॅम्प शुल्क न भरता महसूल बुडवण्यात आल्याचा आरोप होता. याशिवाय, सीआरझेड नियम उल्लंघन, अकृषी परवानगीसाठी बनावट कागदपत्रे आणि वीजजोडणीसाठी खोटी माहिती दिल्याचेही नमूद करण्यात आले होते.
मात्र, बचाव पक्षाचे वकील ॲड. सुधीर शरद बुटाला यांनी न्यायालयात सादर केलेल्या युक्तिवादात जमीन आणि बांधकाम हे स्वतंत्र घटक असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने हा मुद्दा ग्राह्य धरत, सरकार पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
दरम्यान, हे प्रकरण केवळ न्यायालयीन पातळीवरच नव्हे तर राजकीय स्तरावरही गाजले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरून परब यांच्यावर सातत्याने आरोप करत आंदोलन आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मुद्दा जिवंत ठेवला होता. त्यामुळे ‘साई रिसॉर्ट’ प्रकरण राज्यातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरले होते.




