
देवळे फाट्यावर उभ्या रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक,रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू : वाहन चालक गाडीसह फरार
संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाट्यावर पॅसेंजरची वाट बघत उभ्या असलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षात असलेल्या चालकाचा रिक्षा बाहेर उडून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (३० एप्रिल) सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.
चाफवली बौद्ध वाडी येथील रिक्षा व्यावसायिक विजय पांडुरंग कांबळे वय (६२) आपली रिक्षा (क्र. एमएच-०८-एओ- २१९१) घेऊन नेहमीप्रमाणे रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील देवळे फाटा येथे पॅसेंजर ची वाट बघत असताना अज्ञात वाहनाने मागून येऊन त्यांच्या रिक्षाला जबरदस्त धडक दिली.
यात रिक्षाचा मागच्या बाजूला चेंदा मेंदा केला झाला. रिक्षात पुढे बसलेले विजय पांडुरंग कांबळे हे रिक्षा बाहेर फेकले गेल्याने रस्त्यावर घासत त्यांचा मृत्यू झाला. ही धडक एवढी जोरात होती की रिक्षा फरपटत सुमारे दहा फूट पुढे नेले.
अज्ञात वाहनाने धडक देऊन आपली गाडी पुन्हा रिव्हर्स घेतली व कोल्हापूरच्या दिशेने सुसाट घेऊन गेला असे तिथून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या रस्ता कामगारांनी सांगितले. ही गाडी स्कॉर्पिओ सदृश असून काळ्या रंगाची असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय कांबळे यांना त्वरित देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले; परंतु डॉ. तुषार चोपडे यांनी त्याला मृत घोषित केले. आमदार किरण सामंत यांच्या ॲम्बुलन्सने विजय कांबळे यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.
या अपघाताचे वृत्त समजतात देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा दूरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघाटे सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पो. हवालदार सचिन पवार, पोलीस हवालदार सचिन कामेरकर हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत चालू आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्ग वर जेथे अपघात झाला, तेथे तीन मोठ्या गाड्या पास होऊ शकतात एवढा मोठा रस्ता असतानाही रस्त्याच्या साईट पट्टीच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने ठोकर दिली.




