जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत हाणामारी झाली. अंगणात कचरा टाकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका वृद्ध दांपत्याला लाकडी काठी व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मैमुना इस्माईल बोंदले (वय ५२) व आरोपी हे शेजारी असून त्यांच्यात गेल्या काही काळापासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. मात्र, यापूर्वी कोणतीही पोलिस तक्रार करण्यात आली नव्हती.

२८ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी अर्बिना खान हिने फिर्यादीच्या अंगणात कचरा टाकला. याबाबत जाब विचारल्याने संतप्त होऊन तिने शिवीगाळ करत हातातील दगडाने मैमुना बोंदले यांच्या ओठावर प्रहार केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी मैमुना यांचे पती इस्माईल बोंदले घटनास्थळी आले असता, इतर सहा आरोपींनी त्यांना घेरले. त्यावेळी मन्सूर अली खान याने लाकडी काठीने इस्माईल यांच्या पाठीवर व डोक्यावर वार केले. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी दांपत्याला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर जखमी मैमुना बोंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अर्बिना खान, मन्सूर अली खान, महिल अझीम खान, जमीर खान, राहिल अझीम खान, शरीफा अली खान आणि शबाना मन्सूर खान या सात जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३५१(२), ११५(२), १८९(२), १९१(२), १९० आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button