ब्रेक फेल झाल्याने एसटीची ट्रकला धडक; कशेडी घाटात मोठा अपघात टळला!


मुंबई-गोवा जुन्या महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी उशिरा रात्री खेड डेपोच्या खेड-बोरिवली एसटी बसचा भीषण अपघात झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या बल्कर ट्रकला बसने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक चालकासह बसमधील १२ ते १३ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.

खेड स्थानकातून रात्री १० वाजता सुटलेली ही बस सुमारे ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील भोगाव परिसरात पोहोचली असता अपघात घडला. ज्या ठिकाणी ही धडक झाली त्या ठिकाणी एका बाजूला खोल दरी असून बस थोडक्यात दरीत कोसळण्यापासून वाचली. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे.

कशेडी घाट परिसरात यापूर्वीही रस्ता खचण्याच्या घटना घडत आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा सुरू करण्यात आला असला, तरी स्थानिक वाड्या-वस्त्यांच्या सोयीसाठी काही एसटी बसेस अद्याप जुन्या घाटमार्गावरूनच धावत आहेत.

दरम्यान, भोगाव परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणी बस आल्यावर अचानक ब्रेक फेल झाल्याने अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनी कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात येत नसल्याची तक्रारही व्यक्त केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच शिवसेना खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, अक्षय भोसले, निखिल चौधरी, समीर मोरे आणि दर्पण दरेकर यांनी जखमींना मदतकार्य केले. पोलादपूर पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.

या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, सुदैवाने बस दरीत कोसळली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे घाटातील रस्ते सुरक्षा, सुरू असलेली कामे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button