
शाम-ए-गझल’मैफलीने रसिक मंत्रमुग्ध; गौतमी वाडकर ठरली गझल गायन स्पर्धेची विजेती

रत्नागिरी:
शब्दांची नजाकत आणि स्वरांचा लहेजा यांचा सुरेख संगम असलेल्या ‘शाम-ए-गझल’ या कार्यक्रमाने नुकतीच रत्नागिरीकरांची मने जिंकली. कला क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘आर्ट सर्कल फाउंडेशन’च्या वतीने कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष होते. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरी आणि सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे यांची सुश्राव्य मैफिल अनुभवायला मिळाली.

चुरशीची स्पर्धा आणि निकाल
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या चुरशीच्या स्पर्धेत स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस गझला सादर करून परीक्षकांची दाद मिळवली. या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे:
- प्रथम क्रमांक: गौतमी वाडकर (संगमेश्वर)
- द्वितीय क्रमांक: लीना खामकर (रत्नागिरी)
- तृतीय क्रमांक: प्रतीक्षा कोयंडे (कणकवली)
विजेत्यांना स्वराधिराज श्री. राजाभाऊ शेंबेकर आणि मुख्य परीक्षक दत्तप्रसाद रानडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दत्तप्रसाद रानडे यांची स्वरमैफिल व मार्गदर्शन
दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध गझल गायक व संगीतकार दत्तप्रसाद रानडे यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘चुपके चुपके’, ‘काश ऐसा कोई मंजर होता’ आणि ‘एक होकार दे’ यांसारख्या प्रसिद्ध गझला सादर करत त्यांनी मैफलीत रंग भरला.
यावेळी स्पर्धकांशी संवाद साधताना रानडे म्हणाले, “गझल सादर करताना आपण कविताच सादर करत आहोत, ही भावना महत्त्वाची आहे. सतत हरकती घेऊन गाणे म्हणजे गझल नव्हे, तर शब्दांच्या आशयावर आणि उच्चारांवर भर दिला पाहिजे.”
या स्पर्धेला निखिल रानडे व प्रथमेश शहाणे (तबला) आणि चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम) यांनी पूरक साथसंगत केली. दत्तप्रसाद रानडे यांच्या मैफलीत हेरंब जोगळेकर (तबला) आणि उदय गोखले (व्हायोलिन) यांच्या वादनाने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. ध्वनिसंयोजनाची जबाबदारी एस. कुमार साऊंडच्या उदयराज सावंत यांनी नेहेमीप्रमाणे समर्थपणे पेलली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन कानविंदे यांनी केले. गझल प्रेमी आणि साहित्याची ओढ असणाऱ्या रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा ‘स्मृती सोहळा’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.




