
मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर भरधाव फॉर्च्यूनर थेट घर, हॉटेलमध्ये घुसली; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली !
मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास भरधाव फॉर्च्यूनर कारचे नियंत्रण सुटून ती थेट महामार्गालगत असलेल्या घर व हॉटेलमध्ये घुसल्याने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने अपघाताच्या वेळी हॉटेलमध्ये कोणीही नसल्याने संभाव्य मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी फॉर्च्यूनर कार प्रचंड वेगात होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने प्रथम महामार्गालगतचा बोर्ड उडवला आणि त्यानंतर थेट रस्त्यालगत असलेल्या घर व हॉटेलमध्ये घुसली. या भीषण धडकेत हॉटेलमधील उसाच्या रस गाळण्याची मशीन, टेबल-खुर्च्या, इतर साहित्य तसेच संपूर्ण पत्र्याची शेड उद्ध्वस्त झाली. अपघाताचा जोर इतका प्रचंड होता की परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरच हा अपघात घडल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सुदैवाने हॉटेलमध्ये ग्राहक किंवा कर्मचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली, अन्यथा गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला.



