खेड महावितरण कार्यालयात संजय कदमांची धडक; स्थानिकांना डावलल्याचा आरोप, आंदोलनाचा इशारा


खेड : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) उपविभाग, खेड येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात सोमवार दि. २० एप्रिल २०२६ रोजी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजय कदम यांनी अचानक धडक देत कंत्राटी भरती प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवले. कंत्राटी पद्धतीने भरती करताना स्थानिक बेरोजगार तरुण-तरुणींना डावलून, कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी कदम यांनी उपकार्यकारी अभियंत्यांची भेट घेत, सध्या कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या स्थानिक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनाच पुन्हा संधी देण्याची ठाम मागणी केली. “स्थानिकांना वगळून कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना, विशेषतः पत्नींना, कंत्राटी नोकरी देण्यामागील नेमके कारण काय?” असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
तसेच, कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या ‘साई केदार सर्विस’ या कंपनीच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक बेरोजगारांना संधी नाकारून बाहेरील व्यक्तींना किंवा संबंधितांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिले जात असल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
कदम यांनी महावितरण प्रशासन व संबंधित कंत्राटदारांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देत, “भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. कोणालाही खुर्चीत बसू देणार नाही, महावितरणमधील घोटाळे उघड करू आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन करू,” असा इशारा दिला.
या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण वर्तुळात खळबळ उडाली असून स्थानिक बेरोजगारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसांत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिकांना न्याय मिळावा आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी, हीच या आंदोलनामागील मुख्य भूमिका असल्याचे संजय कदम यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button