जुन्या पाच रुपयाच्या नोटेवर १५ लाख रुपये देण्याच्या बहाण्याने वृद्धाची ९ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक


जुन्या पाच रुपयाच्या नोटेवर १५ लाख रुपये देण्याच्या बहाण्याने वृद्धाची ९ लाख २१ हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या दरम्यान घडली. हनुमंत मारुती शिवलकर (७१, रा. भाटिमिर्‍या रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी अमित चव्हाण (रा. उत्तरं प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमित चव्हाण याने फेसबुक या समाजमाध्यमावर रिल्स तयार करुन ५ रुपयाच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चित्र असल्यास १५ लाख रुपये दिले जातील असे आमिष दाखविले होते. समाजमाध्यमावरील रिल्स पाहून तक्रारदार यांनी आरोपी याच्याशी संपर्क साधला तसेच आपल्याकडे अशी नोट असल्याचे सांगितले. यावेळी आरोपी याने काही रक्कम भरणा करावी लागेल, अशी बतावणी तक्रारदार यांच्याकडे केली. तक्रारदार यांनी त्याला सहमती दर्शविल्यानंतर आरोपीने गुगल पे च्या माध्यमातून पैसे भरण्यास सांगितले. १५ लाख रुपये मिळणार असल्याच्या आशेने तक्रारदार यांनी ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात एकूण ९ लाख २१ हजार रुपये आरोपी याने सांगितलेल्या खात्यामध्ये जमा केले.
दरम्यान पैसे भरुनही १५ लाख रुपये मिळत नसल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. त्यानुसार तक्रारदार यांनी रत्नागिरी शहर पोलिसात संशयिताविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अमित चव्हाण नावाच्या संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button