दापोली तालुक्यात १७ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या…

दापोली तालुक्यातील मुगीज गोमलेवाडी येथे एका १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आर्यन प्रकाश गोमले (वय १७ वर्षे ३ महिने) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे दापोली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मोबाईलच्या अतिवापराचे व्यसन आणि त्याच दिवशी सुरू होणाऱ्या परीक्षेचा तणाव यातून त्याने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत आर्यन हा इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत होता. त्याला मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरण्याची सवय होती. ९ एप्रिल २०२६ रोजी त्याची तोंडी परीक्षा सुरू होणार होती. सकाळी ९ च्या सुमारास आर्यनची आई प्रतिभा प्रकाश गोमले या कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात घरात कोणीही नसताना आर्यनने बेडरूममधील लाकडी वाशाला नायलॉनच्या साडीने गळफास लावून घेतला. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने गळफासातून खाली उतरवून उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.परीक्षेच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने गोमले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button