
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक गरुडझेप; नक्त एनपीए ‘शून्य’ टक्के
रत्नागिरी : सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३१ मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकेने ०.०० टक्के नक्त एनपीए (Net NPA) राखण्यात यश मिळवून आपली आर्थिक स्थिती ‘भक्कम’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या आर्थिक वर्षात बँकेने ३२ कोटी ०१ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून एकूण व्यवसाय ५८५५ कोटी ३९ लाखांवर पोहोचला असल्याची माहिती अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला संचालक बाबाजी जाधव, ॲड. दीपक पटवर्धन, रमेश कीर, नेहा माने यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ आणि सदस्य उपस्थित होते.
१९५७ मध्ये स्थापन झालेल्या या बँकेने अनेक चढ-उतार पाहिले, मात्र गेल्या १९ वर्षात डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून बँकेचे रूप पालटले आहे. एकेकाळी तोट्यात आणि अडचणीत असलेली ही बँक आज महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून नावारूपाला आली आहे. बँकेच्या सध्या ७५ शाखा असून त्यापैकी ९६ टक्के शाखा स्वतःच्या मालकीच्या जागेत कार्यरत आहेत. डिजिटल बँकिंगमध्येही बँकेने आघाडी घेतली असून जिल्ह्यात ३ ‘मोबाईल एटीएम व्हॅन’द्वारे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवली आहे.
केवळ नफा न कमावता सामाजिक बांधिलकी जपत बँकेने प्राथमिक शाळांना १०० संगणक संच, ३० शाळांना सोलर युनिट आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. सहकरी संस्थांना ३० टक्के लाभांश देणारी ही देशातील पहिली जिल्हा बँक ठरली आहे. सलग १८ वर्षे नफ्यात राहून बँकेने ऑडिट वर्ग ‘अ’ कायम राखला असून, ग्राहकांचा विश्वास हेच आमच्या यशाचे गमक असल्याचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी यावेळी नमूद केले.
चौकट
बँकेचा आर्थिक लेखाजोखा
(३१ मार्च २०२६ अखेर)
एकूण व्यवसाय : ₹ ५८५५ कोटी ३९ लाख
एकूण ठेवी : ₹ ३३५७ कोटी १४ लाख
कर्ज वाटप : ₹ २४९८ कोटी २५ लाख
गुंतवणूक : ₹ १२८९ कोटी २८ लाख
निव्वळ नफा : ₹ ३२ कोटी ०१ लाख
नक्त एनपीए : ०.०० टक्के
सीडी रेशो : ७४.४२ टक्के
ठळक वैशिष्ट्ये
शून्य टक्के नक्त एनपीए: आर्थिक शिस्तीचा कळस.
३०% लाभांश: सहकारी संस्थांना लाभांश देणारी देशातील पहिली जिल्हा बँक.
डिजिटल क्रांती: युपीआय, क्यूआर कोड आणि मोबाईल व्हॅन एटीएम सुविधा.
पुरस्कारांची मोहोर: सहकार भूषणसह २० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित.




