लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची आंदोलनकर्त्यांना साथ

मुंबई : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही पाठिंबा मिळाला असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांच्या समस्या आणि आंदोलनामागील जनहिताचा उद्देश जाणून घेत त्यांना संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि जनक जन आक्रोश समिती यांच्या प्रतिनिधींनी मुंबईत जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लक्ष्मी ऑरगॅनिककडून ‘पी-फास’सारख्या घातक रसायनांची निर्मिती होत असून, त्यामुळे कोकणातील पर्यावरण आणि मानवी आरोग्य धोक्यात येत असल्याची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, हा लढा कोणत्याही वैयक्तिक किंवा राजकीय हेतूने नसून कोकणचा निसर्ग, शेती, पाणी आणि स्थानिकांचे जीवन वाचवण्यासाठी उभारलेला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसेने या जनआंदोलनाच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी या लढ्याला मनसेचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. “जिथे जिथे गरज लागेल, तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत ठामपणे उभी राहील,” असे त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.

यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही, “या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी आहे,” असे स्पष्ट करत संघर्षाला राजकीय व नैतिक बळ दिले.

या भेटीवेळी मनसेचे दक्षिण मुंबई संपर्क उपाध्यक्ष मनीष पात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे खेड तालुका अध्यक्ष मंगेश चाळके, तसेच लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, कोकण नागरी संघर्ष समिती, जनआक्रोश समितीचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button