
कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने डांबराच्या किंमतीनी उसळी घेतली
आखाती देशांमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात धुमसत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट तडाखा आता महाराष्ट्रातील, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते विकास कामांना बसू लागला आहे. डांबर निर्मितीसाठी लागणारा कच्च्या माल आखाती देशांतून मुंबईत आयात केला जातो. मात्र, या युद्धामुळे समुद्री वाहतुकीवर मोठे निर्बंध आले असून, जहाजांच्या येण्या-जाण्यात अनियमितता वाढली आहे. कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाल्याचा परिणाम डांबराच्या दरांवर झाला असून, किमतींनी मोठी उसळी घेतली आहे.
काही काळापूर्वी ६३.५० रुपये प्रति किलो मिळणारे डांबर आता ८३.५० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अवघ्या काही दिवसांत किलोमागे २० रुपयांची झालेली ही दरवाढ बांधकाम क्षेत्रासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. मुंबईतील चेंबूर आणि माहूल येथील केंद्रांमधून रत्नागिरी जिल्ह्याला डांबराचा पुरवठा केला जातो. जिल्ह्याचा विचार करता, वर्षभरात रस्ते बांधणी आणि दुरुस्तीसाठी सुमारे १० हजार टनांपेक्षा अधिक डांबराची आवश्यकता भासते. मात्र, वाढलेल्या दरांमुळे ठेकेदारांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.www.konkantoday.com




