मासेमार व्यवसासमोर डिझेल दरवाढीचे मोठे संकट


अरबी समुद्राच्या अथांग लाटांवर स्वार होऊन लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह करणार्‍या रत्नागिरीतील मच्छिमारी व्यवसायासमोर सध्या इंधन दरवाढीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आता थेट कोकणच्या किनारपट्टीवर धडकली असून, तेल कंपन्यांनी २० मार्च २०२६ पासून बल्क ग्राहक डिझेल दरात केलेल्या भरमसाठ वाढीमुळे मच्छिमार हवालदिल झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या विस्तीर्ण किनारपट्टीवर हजारो नौका आणि ट्रॉलर मासेमारीसाठी सज्ज असतात, मात्र इंधनाचे गणित बिघडल्याने अनेक बोटी आज किनार्‍यावरच खिळून आहेत. सर्वसामान्य ग्राहकांसाठी डिझेलचा दर
प्रति लिटर ९० रुपयांच्या आसपास असताना, मच्छिमार सहकारी संस्थांना मात्र बल्क ग्राहक श्रेणीत टाकल्यामुळे तब्बल ११२ रुपयांहून अधिक दर मोजावा लागत आहे. प्रति लिटर २२ रुपयांचा हा अतिरिक्त भार मच्छिमारांच्या आर्थिक कंबरड्यावर प्रहार करणारा ठरत आहे.
मासेमारी हा व्यवसाय पूर्णपणे इंधनावर आधारित असल्याने, एका बाजूला मासळीची घटती आवक आणि दुसर्‍या बाजूला वाढलेला उत्पादन खर्च यामुळे मच्छिमार मोठ्या तोट्यात जात आहेत. या गंभीर परिस्थितीवर अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मासेमारी हा शेतीप्रमाणेच प्राथमिक क्षेत्रातील व्यवसाय असताना, त्यावर औद्योगिक दरांचा बोजा लादणे हा मच्छिमारांवर अन्याय असल्याचे मत व्यक्त होत आहे. यापूर्वीच्या रशिया-युक्रेन युद्धाचा समितीचे पदाधिकारी बर्नार्ड डिमेलो दाखला देत सांगितले की, वेळोवेळी मागणी करूनही मच्छिमारांसाठी अद्याप स्वतंत्र दरव्यवस्था लागू करण्यात आलेली नाही. याचा फटका आता रत्नागिरीसह पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या पाचही किनारी जिल्ह्यांना बसत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button