गॅस आणि पेट्रोल प्रश्नावर ग्राहक पंचायती सोबत जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा

रत्नागिरी : सद्यस्थितीत सर्व पेट्रोल, डिझेल आणि गॅस इंधन पुरवठ्याबाबत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेतली. केंद्र आणि राज्यस्तरावरील प्राप्त निवेदनानुसार पुरेसा इंधन पुरवठा असल्याचे सांगण्यात येत असूनही ग्राहक पेट्रोलसाठी रांगा लावून असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. याच अनुषंगाने पेट्रोल पंपवर साठ्याबद्दल सुस्पष्ट फलक लावावेत आणि त्यावर वेळ नमूद करून प्रति तीन तासांनी त्या त्या वेळेची साठ्याची माहिती प्रदर्शित करावी अशी आग्रही मागणीही ग्राहक पंचायतीने केली.

यावेळी ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात शासनाने यांत्रिक शेती उपकरणासाठी शेतकऱ्यांना पुरेसे इंधन अखंड मिळण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत कृषी क्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मार्ग काढण्याबाबतही सूचित करण्यात आले.
सध्या गॅस वितरकांकडे ऑनलाईन बुकिंग प्रमाणे नोंदणी झाल्यावर देखील दीर्घकाळ गॅस सिलेंडर दिला जात नाही. या ऐवजी ग्राहकांना रिकामा सिलेंडर आणा आणि भरलेला घेऊन जा असे सांगण्यात येत आहे. घरपोच गॅस सिलिंडर वितरण होत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर सुरक्षित पद्धतीने घरपोच देण्यासाठी निर्देश द्यावे, तसेच ज्या ग्राहकांनी गॅस सिलेंडर वितरक यांच्याकडून नेले आहेत त्यांना वितरण खर्चाचा परतावा देण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
रत्नागिरीत गॅसपाईप लाइन चालू आहे. काही भागातून ही पाईपलाईन गेली आहे; मात्र कनेक्शन दिली नाही. ती प्राधान्याने लवकर दिली जावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पाईप गॅस कंपनीकडे वस्तुस्थिती जाणून घेतली आणि तत्काळ पाईप गॅससाठी नव्याने ठेकदार नियुक्त करून वेगाने जास्तीत जास्त गॅस जोडण्या देण्याची कार्यवाही गतिमान केली आहे.

जिल्हाधिकारी यांनी अतिशय सकारात्मक आणि तत्काळ प्रतिसाद देत जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत योग्य पद्धतीने, समक्ष निर्देश दिले असल्याने ग्राहक पंचायत अध्यक्ष संजय वैशंपायन, सदस्य संतोष गाडगीळ, अनंत भडकमकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ग्राहक पंचायत ग्राहकांच्या समस्या न्याय्य पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. ग्राहकांनी आपल्या समस्या ग्राहक पंचायत यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन सदस्य दीपक राऊत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button