
दिव्यांग प्रमाणपत्र; पालकमंत्री डॉ. उदय सामंत करणार स्वत: निराकरणसोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात १० ते १२ या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. २५ :- दिव्यांग प्रमाणपत्राबाबत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे सोमवार 30 मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वत: उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील दिव्यांगांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत ज्या काही समस्या असतील, त्या मांडण्यासाठी, मार्गी लावण्यासाठी दिव्यांगांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र देण्यातील त्रुटी, दिव्यांग टक्केवारी ठरविण्यातील समस्या, दिव्यांग प्रमाणपत्राबाबत प्रलंबितता शिवाय ते मिळवताना येणाऱ्या अडचणी अशा विविध समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री डॉ. सामंत हे स्वत: उपस्थित राहून या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये हे देखील उपस्थित राहणार आहेत.




