
बदलत्या हवामानाचा रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकावर परिणाम
हवामान बदलाचा गंभीर परिणाम यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांवर होत असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. १७ मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, आंबा उत्पादनात सरासरी ८० टक्क्यांहून अधिक घट होण्याचा अंदाज आहे.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांच्या शास्त्रज्ञांनी फेब्रुवारी व मार्च महिन्यात केलेल्या संयुक्त पाहाणी दौर्यातून ही चिंताजनक स्थिती समोर आली आहे. जिल्ह्यात आंब्याखालील ६८,५५० हेक्टर क्षेत्रापैकी ६२,२८० हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, दरवर्षी साधारण १,८६,८४० मे. टन उत्पादन मिळते. मात्र यंदा हे उत्पादन केवळ ३७,३६८ मे. टनपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दीर्घकाळ टिकलेली थंडी, तापमानातील घट आणि हवामानातील अस्थिरता ही या नुकसानीची प्रमुख कारणे असल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे. या परिस्थितीमुळे आंब्याच्या झाडांवर संयुक्त फुलांचे प्रमाण कमी होऊन नर फुलांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी परागीभवन नीट न झाल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही. त्याचबरोबर पहिल्या मोहोरातील फळगळ वाढली असून, झाडांना पुन्हा मोहोर येत असल्याने हंगाम विस्कळीत झाला आहे.
काजू पिकालाही याच परिस्थितीचा फटका बसला असून उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांची घटे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील १,१२,५५७ हेक्टर काजू क्षेत्रापैकी ९४,६८० हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. साधारण १,४२,०२० मे. टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा ते केवळ ७१,०१० मे. टनपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. थंडी, धुके आणि दवामुळे काजूचा मोहर सुकला असून बोंडू व बियांची गुणवत्ता घसरली आहे.www.konkantoday.com




