
समाजातील ऐक्य दृढ करूया, विद्यार्थ्यांना दिशा देऊया : सीए केदार करंबेळकर
कुवारबाव ब्राह्मण सभेचा गुढीपाडवा स्नेहमेळावा
रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे कार्य २३ वर्षे सुरू असून हे कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे. गुढीपाडवा स्नेहमेळाव्यात समाजसेवेचा वसा घेतलेल्या संस्था, व्यक्तींचा हृद्य सत्कार करण्यात आला. आपला समाज संस्कार, शिक्षण, सामाजिक बांधिलकी या मूल्यांनी उभा राहिला आहे. आजच्या बदलत्या काळात ही मूल्य अधिक बळकट करण्याची गरज आहे. समाजातील ऐक्य दृढ करूया, विद्यार्थ्यांना व नव्या पिढीला योग्य दिशा देऊया, आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेऊया. असे प्रतिपादन सीए केदार करंबेळकर यांनी केले.
कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या नाचणे येथील यशवंत हरि गोखले संकुलात दि. २२ मार्च रोजी झालेल्या गुढीपाडवा स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनंत आगाशे, कार्याध्यक्ष विद्याधर देशकुलकर्णी, उपाध्यक्ष रविंद्र इनामदार, सौ. तेजा मुळ्ये, कार्यवाह रविंद्र रानडे, खजिनदार विलास कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात महिला भगिनींनी चैत्रागौरी पूजन केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. याप्रसंगी ईशा गुर्जर, स्पृहा पोंक्षे, अनुष्का नानिवडेकर, वरद पोंक्षे, गुरुप्रसाद पटवर्धन या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार झाला. तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. सुरेखा जोशी, यशराज बोडस, मयूर देसाई, विक्रम जोशी व प्रमोद कोनकर यांना सन्मानित करण्यात आले. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना गौरवण्यात आले आहे. विवाहाला ५० वर्षे पूर्ण केलेले सभासद शरदचंद्र नातू व सौ. शुभांगी नातू, दिगंबर घैसास व वंदना घैसास, श्रीधर गणपुले व सौ. सुजाता गणपुले, वासुदेव मुसळे व सौ. वैशाली मुसळे, जयवंत करंदीकर व सौ. रोहिणी करंदीकर, दत्ताराम देवस्थळी व सौ. पद्मा देवस्थळी यांना गौरवण्यात आले. सूत्रसंचालन सौ. पूर्वा साने यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात अनंत आगाशे यांनी सांगितले की, संस्थेची वास्तू पूर्ण झाली असून संकल्पानुसार लिफ्ट, अभ्यासिका, रंगकाम अशी सर्व कामे पूर्णत्वास जात आहेत. सभासदांनी तन, मन, धनाने संस्थेसाठी योगदान देण्याची गरज आहे. तरुणांनीही या संस्थेत येऊन कामकाज पाहिले पाहिजे याकरिता आमचा प्रयत्न सुरू आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या सभासदांच्या नातेवाइकांना राहण्यासाठी व्यवस्थाही येथे करण्यात येणार असून सदस्यांनी कोणताही घरगुती, धार्मिक कार्यक्रम आपल्या सभागृहात केल्यास संस्थेला हातभार लागेल. ही वास्तू स्वयंअर्थसहाय्यित करण्यासाठी प्रयत्न आहे.
या कार्यक्रमानंतर सदाबहार मराठी गीतांचा कार्यक्रम गायिका सौ. करुणा पटवर्धन, सौ. देवश्री शहाणे यांनी सादर केला. त्यांना तबलासाथ प्रथमेश शहाणे व हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन व तालवाद्यसाथ राघव पटवर्धन या बालकलाकाराने केली. कार्यक्रमाला श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला.
संस्थांचा विशेष सत्कार
विशेष उल्लेखनीय पुरस्कार व्यक्ती, संस्थांना सन्मानित केले. यामध्ये समाजसेवा पुरस्कार विकास साखळकर यांना आणि पर्यावरण मित्र पुरस्कार ओमसाई मित्रमंडळ, गोसेवा पुरस्कार सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेला प्रदान करण्यात आला. रखमा पां. केळकर एज्युकेशन ट्रस्टच्या सौजन्याने गोखले भवनच्या दुसऱ्या मजल्यावर कै. दत्तात्रय पां. केळकर अभ्यासिकेचे उद्घाटन सीए करंबेळकर यांनी केले.




