
कोकणात आता फुल्ली ऍटोमेटीक काजू प्रक्रिया राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय
कोकणची ओळख असलेला काजू आता जागतिक बाजारपेठेत आपली भक्कम छाप पाडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. व्हिएतनाम आणि कंबोडियाच्या धर्तीवर अत्याधुनिक ’फुल्ली ऑटोमॅटिक’ काजू प्रक्रिया प्रकल्प रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सोबतच पालघर जिल्ह्यातही असे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून, संपूर्ण कोकण किनारपट्टीला ’काजू हब’ बनवण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य काजू परिषदेच्या बैठकीत या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाला.
या निर्णयामुळे कोकणातील काजू उद्योगात मोठी क्रांती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मजुरांच्या कमतरतेवर उपाय म्हणून आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जाणार असून, यासाठी तज्ज्ञ सल्लागारांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत ५०० ते ५००० मेट्रिक टन क्षमतेची अत्याधुनिक गोदामे उभारली जाणार आहेत. सुमारे सव्वा लाख टन काजू बी साठवण्याची क्षमता निर्माण होणार असून, त्यामुळे शेतकर्यांना योग्य भाव मिळेपर्यंत माल साठवून ठेवणे शक्य होणार आहे. यामुळे कमी दरात काजू विक्री करण्याची वेळ टळणार आहे.
www.konkantoday.com




