४५० माकडांची धरपकड, शेतकर्‍यांना दिलासा !


रत्नागिरी वन परिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून बागायतदार आणि शेतकर्‍यांच्या नाकीनऊ आणणार्‍या माकडांच्या उपद्रवावर वन विभागाने मोठी कारवाई करत आतापर्यंत ४५० माकडांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश मिळवले आहे. या मोहिमेमुळे शेतकरी व बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात माकडांचा उपद्रव वाढल्याने अनेक शेतकरी आणि बागायतदार त्रस्त झाले होते. काही ठिकाणी या उपद्रवामुळे शेतकर्‍यांनी शेती करणेही सोडून दिल्याच्या घटना घडल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार परिसरात सुमारे साडेतीन ते चार हजार माकडांची संख्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर वन विभागाने माकडे पकडण्याची विशेष मोहीम हाती घेतली.
या मोहिमेत आतापर्यंत ४५० माकडांची धरपकड करण्यात आली आहे. यापूर्वी एका माकडाला पकडण्यासाठी सुमारे ७८० रुपये खर्च येत होता, मात्र राज्य शासनाने संपूर्ण राज्यासाठी आता ४५० रुपये असा एकसमान दर निश्चित केल्याने कमी खर्चात ही मोहीम राबवणे शक्य झाले आहे. त्यामुळे वन विभागाच्या निधीचीही बचत झाली आहे. वन विभागाने जिल्ह्यातील लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांत ही मोहीम राबवली. तीन विशेष पिंजर्‍यांच्या मदतीने माकडांची धरपकड करण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button