हायटेक निगराणीपुढे कॉपीबहाद्दर हतबल!

बारावीच्या आयटी परीक्षेत 'डिजिटल त्रिसूत्री'चा 'सर्जिकल स्ट्राईक' दोन दिवसांत कोल्हापूर-कोकण विभागात एकही गैरप्रकार नाही; तांत्रिक कारणाने बाधित ५ केंद्रांवर उद्या शनिवारी होणार पुनर्परीक्षा.

ज्या विषयाची परीक्षा ‘माहिती तंत्रज्ञान’ (IT) आहे, तिथे गैरप्रकार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचाच असा काही वापर करण्यात आला आहे की, कॉपी करणे आता ‘इम्प्लॉसिबल’ झाले आहे. राज्य मंडळाच्या निर्देशानुसार कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाने यंदा राबवलेली ‘डिजिटल त्रिसूत्री’ आणि ‘त्रयस्थ पर्यवेक्षकांची नियुक्ती’ ही रणनीती यशस्वी ठरली असून, परीक्षेच्या पहिल्या दोन दिवसांतील चारही सत्रांत एकही अनुचित प्रकार घडलेला नाही. “आता काहीच लपून-छपून चालणार नाही” असा संदेश मंडळाने यातून दिला आहे.

विभागीय अध्यक्षांच्या केंद्रांना भेटी.

विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी स्वतः कोल्हापूर शहरातील ‘चाटे इन्स्टिट्यूट’सह ग्रामीण भागातील उत्तूर, पाल आणि मुधाळ या केंद्रांवर ‘सरप्राईज व्हिजिट’ देऊन यंत्रणेला सतर्क केले. अध्यक्षांनी स्वतः ‘डेमो एक्झाम’ देऊन या प्रणालीचा अनुभव घेतल्याने, केंद्रांवर तांत्रिक बाबींमध्ये होणारी कोणतीही हयगय त्यांच्या नजरेतून सुटली नाही. दुसरीकडे, कोकण विभागीय सचिव पुनीता गुरव यांनी रत्नागिरीमधील केंद्रांचे सूक्ष्म संनियंत्रण केले, तर सातारा-सांगलीमध्ये भरारी पथके सक्रिय होती.

अशी आहे ही ‘डिजिटल’ तटबंदी:
डिजिटल त्रिसूत्री: विद्यार्थ्याच्या संगणकावरील प्रत्येक हालचालीचे ‘स्क्रीन रेकॉर्डिंग’, बाह्य मदतीसाठी लागणारे ‘ॲप ब्लॉकिंग’ आणि संपूर्ण लॅबवर लक्ष ठेवणारे ‘सीसीटीव्ही कॅमेरे’.

त्रयस्थ पर्यवेक्षक: महाविद्यालयाचे स्वतःचे शिक्षक प्रयोगशाळेत नसल्याने ‘लोकल सेटिंग’ला पूर्णपणे लगाम लागला आहे.

या डिजिटल उपायोजनांमुळे गैरप्रकारांना आता कोणताही वाव राहिलेला नाही. विशेष म्हणजे, कोणी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तरी तो पुराव्यासह आपोआप तांत्रिक प्रणालीमध्ये रेकॉर्ड होणार असल्याने, विद्यार्थ्यांनी स्वकष्टाने परीक्षा देण्यालाच प्राधान्य दिले आहे.

दोन दिवसांची उपस्थिती (सलग आकडेवारी):
गुरुवार (१२ मार्च): पहिल्या सत्रात कोल्हापूर विभागात ४,८२४ तर कोकण विभागात १,०४३ विद्यार्थी उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात कोल्हापूरमध्ये ४,८४७ तर कोकणात १,०८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

शुक्रवार (१३ मार्च): तिसऱ्या सत्रात कोल्हापूर विभागात ४,८६८ तर कोकण विभागात १,०३१ विद्यार्थी उपस्थित होते. चौथ्या सत्रात कोल्हापूरमध्ये ४,८९८ आणि कोकणात ९१३ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

बाधित विद्यार्थ्यांसाठी उद्या ‘रि-एक्झाम’
वीज पुरवठा खंडित होणे किंवा इंटरनेटच्या तांत्रिक अडचणीमुळे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण होऊ शकली नाही, त्यांना मंडळाने दिलासा दिला आहे. सातारा जिल्ह्यातील दोन, सांगलीतील एक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन अशा एकूण पाच केंद्रांवर उद्या, शनिवार दिनांक १४ मार्च रोजी शेवटच्या दिवशी पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.

“डिजिटल त्रिसूत्री आणि त्रयस्थ पर्यवेक्षक यामुळे मानवी हस्तक्षेपाला जागा उरलेली नाही. गैरप्रकार आपोआप रेकॉर्ड होण्याची भीतीच आता कॉपीमुक्त परीक्षेला चालना देत आहे. तांत्रिक कारणाने अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्या आम्ही पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे.”
— राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button