
शिमगोत्सवावरून तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन; हातदेतील पाच जणांवर गुन्हा
राजापूर : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील हातदे येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
हातदे गावात शिमगोत्सवाच्या आयोजनावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटवून सण शांततेत पार पाडण्यासाठी राजापूरचे तहसीलदार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये २८ फेब्रुवारी रोजी विशेष आदेश जारी केला होता. या आदेशानुसार दोन्ही गटांनी एकत्रितपणे शिमगोत्सव साजरा करावा तसेच ग्रामदेवतेची पालखी ‘पार्टी नंबर ०२’ च्या घरी नेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले होते.
मात्र २ मार्च २०२६ पासून ‘पार्टी नंबर ०१’ मधील काही सदस्यांनी या आदेशाचे पालन करण्यास नकार दिल्याचे समोर आले.
तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुशील हरिश्चंद्र चव्हाण, मनोहर अनंत चव्हाण, शांताराम पर्शुराम चव्हाण, दिनानाथ तुकाराम चव्हाण आणि विजय दत्ताराम चव्हाण (सर्व रा. हातदे, ता. राजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पाचल येथील ग्राम महसूल अधिकारी मारुती संजय कोदले (वय ३०) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २२३ आणि ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ५९/२०२६ दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




