सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे प्रेरणादायी मुलाखतीने महिला दिन साजरा

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला दिनाचा कार्यक्रम हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे साजरा झाला. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन आणि उद्योजिका वर्षा पटवर्धन या दोन सख्ख्या बहिणींची प्रेरणादायक मुलाखत रंगली. नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांनीही या कार्यक्रमात महिलांशी संवाद साधला.

याप्रसंगी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे म्हणाल्या की, ३६५ दिवस महिला दिवस असतो. स्त्री कुटुंबाचा कणा आहे. सीए भगिनी आकडेमोड करता. त्यामुळे त्या चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करतात. स्त्रिया सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत. आई म्हणजे फायनान्स मॅनेजर आहे. कोणतीही पदवी नुसती महत्त्वाची नाही त्याचा उपयोग समाजासाठी केला पाहिजे. महिलांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. अत्याचार कमी झाले पाहिजेत. दुसऱ्या स्त्रीचे दुःख समजून घेऊन वागले पाहिजे.

सीए स्नेहा भिंगारदिवे यांनी शिल्पा सुर्वे व वर्षा पटवर्धन यांची मुलाखत घेतली. त्यावेळी वर्षा पटवर्धन म्हणाल्या की, वडिल व व्यायामपटू, अंबाबाई तालीम मंडळाचे प्रमुख, वैद्य म. द. तथा अप्पा करमरकर यांच्यामुळे व्यायामाची सवय लागली. आम्ही ७ बहिणी. त्यामुळे सर्वांनाच व्यायामाची लहानपणापासून सवय. तेहरान, इराणमध्ये १९७३ मध्ये आयोजित वूमन्स कॉन्फरन्समध्ये आम्ही ११ जणी गेलो होतो. त्यात आम्ही दोघी होतो. त्यावेळी मल्लखांब व योग प्रात्यक्षिके केली होती. सिंगापुरी वेताचा मल्लखांब आम्ही दाखवला होता. २१ दिवस अन्य शहरांमध्येही आम्हा भारतीय संघाला संधी मिळाली होती. सर्वत्र आमचे कौतुक झाले. भारतात परतल्यावर पंतप्रधान इंदिरा गांधी व संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भेटलो होतो. त्यावेळी करमरकर यांच्या कन्या म्हणून चव्हाण यांनी खूप कौतुक केले होते. विवाहानंतर रत्नागिरीत आल्यावर फाटक हायस्कूलमध्ये योग शिकवत होते. १९९३ मध्ये रत्नागिरीतील पहिला श्री वैभव हेल्थ क्लब सुरू केला. आजच्या काळात मुलींच्या अनेक समस्या पाहतो. परंतु महिलांनी सातत्य, जिद्द ठेवली पाहिजे. महिलांनी दररोज किमान अर्धा तास अनुलोम- विलोम, कपालभाती योग व १२ सुर्यनमस्कार घातले पाहिजेत.

शिल्पा पटवर्धन म्हणाल्या की, खेळ किंवा व्यायामामुळे आयुष्यात कोणत्याही अडचणीच्या प्रसंगाला सामोरे जावू शकतात, नकार पचवू शकतात. खिलाडू वृत्ती त्यांच्याकडे येते. मन प्रसन्न राहते. सक्रियता, जिद्द, मनात तयार होते. आपले कोणतेही काम होणार आहे, अशी भावना जाणवते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन हा विषय शिकवला पाहिजे. संस्थाप्रमुख म्हणून काम करताना कसे वागता या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, कामचुकार माणसाला प्रमुख करा, एखाद्याने चांगले काम केले तर त्याचे कौतुक चार लोकांत करा आणि कोणाचीही चूक झाली तर ती एकट्याला सांगा.

या कार्यक्रमात सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए केदार करंबेळकर यांनी मान्यवरांचा सत्कार पुष्परोपटे देऊन केला. तसेच प्रास्ताविक करताना त्यांनी अध्यक्षपदाचा भार व नवीन कमिटी झाल्यानंतरचा हा पहिलाच कार्यक्रम असून महिला नियोजनकार, अष्टपैलू असल्याचे सांगून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सीए नयन सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी कमिटी सदस्य, महिला सीए, सीए फर्ममधील महिला कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button