
जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे विज्ञान दिन उत्साहात संपन्न


रत्नागिरी : जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रत्नागिरीतील श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक आणि तज्ञ म्हणून प्रा. बाबासाहेब सुतार यांना निमंत्रित केले होते. त्यांनी तारांगणातील विविध दालने आणि भौतिक प्रयोग यांचे मार्गदर्शन आपल्या खुमासदार शैलीत उपस्थितांना करून दिले.
त्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या कामगिरीवर आधारित स्लाईड शो आणि त्या अनुषंगाने अवकाशातील विविध गमतीजमती प्रा. सुतार यांनी उपस्थित अभ्यासकांना सांगितल्या. त्यानंतर खगोल दुर्बिणीद्वारे आकाश दर्शन करण्याची संधी उपस्थितांना देण्यात आली. यामध्ये सूर्य, चंद्र, गुरु ग्रह, नेब्युला इत्यादीचे दर्शन उपस्थित विद्यार्थी, खगोल प्रेमी यांना मिळाले.
कार्यक्रमाला जवळजवळ २५० आबाल वृद्धांनी उपस्थिती दर्शविली. विशेष करून विद्यार्थ्यांनी खगोल विषयक शंका विचारल्या आणि उत्तरेही अभ्यासपूर्ण दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आनंदवनचे विद्यार्थी तसेच उपेंद्र बापट, निखिल पावस्कर आदी खगोल प्रेमी टीमने विशेष मेहनत घेतली. तसेच रत्नागिरी नगरपालिकेचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी एक शहर एक विज्ञान जत्रा या भावी उपक्रमाची देखील सुरुवात झाली आणि दरवर्षी असा वैज्ञानिक उपक्रम राबविण्याचा मानस जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष महेश दामले यांनी व्यक्त केला.




