छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान; पालीत पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी शासनाकडून निधी: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामेदैनंदिन जीवनातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी अभियान- डॉ. उदय सामंत


त्नागिरी, दि. 7 ) : रत्नागिरीच्या विमानतळाला विस्तारीकरणासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. हे विमानतळ लवकरात लवकर सुरु करण्याचा महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचा मानस आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासात्मक कामे सुरु आहेत. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ, तरुण, विद्यार्थी या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचा वापर करायला आपण शिकले पाहिजे, यामधून गावे उभी राहतात, शहरे उभी राहतात. यासाठीच या अभियानाचा शुभारंभ केलेला आहे. असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
पाली येथील श्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे शुभारंभ आज पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, जि.प. सदस्य बाबू म्हाप, सुयोग कांबळे, महेंद्र झापडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, साडेतीन वर्षापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना, प्रत्येक जिल्हास्तरावर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात आला, या कार्यक्रमातून जवळजवळ साडेनऊ कोटी जनतेला न्याय देण्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब यशस्वी झाले. तोच हा कार्यक्रम ग्रामपातळीवर राबविण्यात येत आहे. महिला, दिव्यांग, ज्येष्ठ, तरुण या सगळ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न या अभियानातून होत आहे. येथे स्टॉल उभारण्यात आले आहेत. जे दाखले, तुमची कामे तहसिलदार कार्यालयात जाऊन तुम्हाला करावी लागतात, ते या शिबिरात मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी चालू ठेवण्याचा निर्णय काल अर्थसंकल्पामध्ये घेतला आहे. योग्य वेळी महिलांना या योजनेंतर्गत एकवीशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात येईल.
जिल्ह्यातील दिव्यांग संख्या सर्वेक्षण दोन महिन्यात करावे आणि प्रत्येक दिव्यांगांना शासनाच्यावतीने आपल्या नियोजन मंडळातून अशी वस्तू देऊ, ज्याचा त्यांना कायमस्वरुपी आयुष्यभरासाठी उपयोग होईल. याचा जिल्ह्यातील साडेसहा हजार दिव्यांगांना फायदा होईल. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ आपल्याला एकाच ठिकाणी घेता यावा यासाठी यासारखे मंडळस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशा प्रकारचे शिबिरांचे आयोजन ग्रामस्तरावर आयोजित करावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हा हा महसूल विभागाच्या सर्व यंत्रणांनी सज्ज असलेला एक नंबराचा जिल्हा आहे, असे म्हटले तर चुकीचं ठरणार नाही. एवढ्या चांगल्याप्रकारे महसूल यंत्रणी उभी केलेली आहे. पोलीस विभागाला देखील आवश्यक ते सर्व देण्याचा निर्णय पालकमंत्री म्हणून मी घेतलाय. प्रशासनातील सर्व खाती सक्षम असावीत, यासाठी प्रमाणिकपणे काम करत आहोत. शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचा वापर करायला आपण शिकले पाहिजे, यामधून गावं उभी राहतात, शहरे उभी राहतात. यासाठीच या अभियानाचा शुभारंभ केलेला आहे.
अर्थसंकल्पात गायरान जमिनीचा सार्वजनिक उपयोगासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे ग्रामीण भागामध्ये विकासाची दालने खुली होणार आहेत. मराठी भाषा सक्षम करण्यासाठी, सवंर्धन करण्यासाठी मराठी भाषा अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला मराठी भाषा अधिकारी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मराठी भाषा सक्षम, सुदृढ करण्याचे काम ज्या साहित्यिकांनी केले, ते भावी पिढीला कळावेत, यासाठी साहित्यिकांचे संग्रहालय रत्नागिरी येथे होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ, दिव्यांग यांच्यापर्यंत पोहचून त्यांचे आरोग्य विषयक, वेगवेगळे दाखले, सातबारा विषयक, भूसंपादन विषयक अशा विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येत आहे. सातबारासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. डीजिटल सातबारा भूमी अभिलेखच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याची प्रिंट काढून तो वापरता येतो, अशी माहिती त्यांनी दिली.
महसूल विभाग, सेतू, संजय गांधी निराधार योजना, ग्राम विकास विभाग,पुरवठा विभाग, कृषी विभाग, आरोग्य आदी विभागाकडून देण्यात येणारा लाभ यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना देण्यात आला. तसेच राष्ट्रीय महामार्गअंतर्गत लाभार्थ्यांना नुकसान भरपाई धनादेश देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी श्री. देसाई यांनी केले तर आभार तहसिलदार श्री. म्हात्रे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन करुन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button