रत्नागिरी न. प. चा ३३७ कोटीचा अर्थसकल्प सादर, पायाभूत सुविधांवर देणार भर


रत्नागिरी नगरपरिषदेने आगामी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा सविस्तर अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये शहर विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे. या नव्या अर्थसंकल्पात नगर परिषदेने ६६ कोटी ५८ लाख ४३ हजार ४७० रुपयांच्या आरंभीच्या शिलकीसह एकूण शिलकीचा आकडा १७ कोटी ९६ लाख ९६ हजार ८१९ रुपयांवर नेऊन ठेवला आहे. विशेष म्हणजे, महसुली आणि भांडवली अशा दोन्ही स्तरांवरील जमा-खर्चाचा ताळेबंद मांडताना नगरपरिषदेने शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि समाजकल्याण योजनांसाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. नगर परिषदेच्यावतीने सोमवारी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आगामी वर्षात नगरपरिषदेला विविध मार्गांनी एकूण ३३७ कोटी ८९ लाख ६० हजार २०१ रुपये जमा होणे अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने शासनाकडून मिळणारी विविध अनुदाने आणि स्थानिक करांचा समावेश आहे. खर्च बाजूचा विचार करता, नगरपरिषदेने ३ अब्ज १९ कोटी ९२ लाख ६३ हजार ३८२ रुपयांच्या खर्चाचे नियोजन केले आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत नगरपरिषदेच्या उत्पन्नात आणि विकासकामांच्या व्याप्तीत मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
नगरपरिषदेने यावर्षी ठळक बाबी अंतर्गत अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी निधी राखीव ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक महत्त्व स्वच्छतेला देण्यात आले असून, घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणीसाठी ३ कोटी ३८ लाख रुपये आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या इतर कामांसाठी ७ कोटी ५० लाख रुपयाची तरतूद केली आहे. तसेच शहराच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी ’विशेष स्वच्छता मोहीम एसटीपी अंतर्गत १६ कोटी १५ लाख रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्त्यांच्या कामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button