
रत्नागिरीत पक्षी मित्र संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘सुसंस्कृत गिधाड’ नाटकाने जिंकली प्रेक्षकांची मने

रत्नागिरी, दि. २३ वन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पक्षी मित्र संमेलन २०२६’ ला निसर्गप्रेमी आणि पक्षी मित्रांचा उदंड प्रतिसाद लाभला. संमेलनाच्या निमित्ताने आयोजित सादरीकरणातून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला. विशेषतः गिधाड संवर्धनावर आधारित ‘कल्चर्ड वल्चर’ (सुसंस्कृत गिधाड) या संगीत नाटकाने या संमेलनात मनोरंजनातून प्रबोधनाचा नवा आदर्श निर्माण करत संमेलनाला शिखरावर पोहचवले.

गिधाड: निसर्गाचा खरा स्वच्छता दूत
संमेलनाच्या कालच्या दिवसाची सांगता वन्यवाणी फाऊंडेशन प्रस्तुत आणि कुणिका बनसोडे-सावंत निर्मित ‘सुसंस्कृत गिधाड’ या नाटकाने झाली. मकरंद भास्कर सावंत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाने गिधाडांचे महत्त्व अधोरेखित केले. रामायणातील जटायूचा संदर्भ देत, गिधाड हे शिकार न करता केवळ मृत प्राण्यांवर आपली उपजीविका करतात आणि पर्यायाने पर्यावरणाचे ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करतात, हा मोलाचा संदेश यातून देण्यात आला. डायक्लोफिनॕकच्या वापराने मृत जनावरांचे मांस खाल्ल्याने गिधाडांची संख्या कमी होत आहे.
मार्मिक भाष्य अन् कडकडाटातून दाद
नाटकातून केवळ निसर्ग संवर्धनच नव्हे, तर मानवी प्रवृत्ती, मूळ स्वभाव आणि प्रलंबित असलेल्या कामांवरही मिश्किल पंचेसच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले.
“अलीकडे ये याला पलीकडे ने माणसा.. हा संवर्धनाचा वारसा”
संगीत नाटकाच्या शेवटाकडे जाताना मानवाच्या निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. “आलिकडे ये याला पलिकडे ने माणसा..हा संवर्धनाचा वारसा..” हा संदेश प्रेक्षकांच्या थेट हृदयाला हात घालून गेला. कलाकारांच्या कसदार अभिनयाला आणि उपरोधिक संवादांना उपस्थितांनी हास्य आणि टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कलाकारांचे जीव ओतून सादरीकरण
या संगीत नाटकात अनेक नामवंत कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला:
अभिनय: मकरंद भास्कर सावंत (अप्पा पात्र), प्रतिकेश मोरे (गिधाड पात्र) आणि ऋतुजा गद्रे.
नृत्य: निहारिका भिडे, अवंतिका चौगुले आणि केतकी कुंभारे.
गायन: वेदांत जाधव, तुलसी कोल्हे आणि गौरी डोंगरे.
संगीत व वादन: साहील परब (संगीत संयोजन), यश खडे आणि मानव वारंग.
नेपथ्य व तांत्रिक बाजू: योगेश गोंधे (प्रकाश), श्रेयस आणि टीम (ध्वनी), डॉ. अभिषेक साटम (वेशभूषा).
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधवी देवळेकर आणि कुणाल चव्हाण यांनी निर्मिती व्यवस्थापन पाहिले. गिधाडांचे संवर्धन ही काळाची गरज असून, या संमेलनामुळे पक्षी रक्षणाच्या मोहिमेला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
या संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचलन गौरी जोशी यांनी केले.




