
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय चिपळूणच्यारौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साहित्यविषयक कार्यक्रमांना प्रतिसाद


चिपळूण :: शहरातील नगर परिषद पुरस्कृत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या (२०००-२०२५) रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य साधून नुकतेच शहरातील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आयत्या वेळच्या विषयावरील वक्तृत्त्व स्पर्धा, बांधावरचे साहित्य संमेलन अध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के यांची मुलाखत आणि नाटककार-कवी कै. अप्पासाहेब जाधव समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेतील विजेते कवी आणि निमंत्रित कवींचे कवी संमेलन आदी साहित्यविषयक उपक्रम नुकतेच उत्साहात संपन्न झाले. शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात संपन्न झालेल्या या उपक्रमांना साहित्यप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभला.

आयत्यावेळच्या विषयावरील वक्तृत्त्व स्पर्धेने आणली रंगत
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनिल खेडेकर, माजी अध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, श्री सार्वजनिक गणेश चिपळूणचे कार्याध्यक्ष रमण डांगे, प्रा. विनायक होमकळस, ‘मसाप’ चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे होते. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आयत्या वेळच्या विषयावरील वक्तृत्त्व स्पर्धासाठीचे विषय आणि स्पर्धांचा विद्यार्थीक्रम चिट्ठीद्वारे काढण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. प्लास्टिक प्रदूषण, उद्योग आणि पर्यावरण, कोकणातील देवराई, पुन्हा एक बाबासाहेब जन्मू दे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अंधश्रद्धा आणि कोकण, सुटाबुटातले बाबासाहेब आदी विषयावर आपले विचार व्यक्त केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. विनायक होमकळस, मच्छिंद्रनाथ वाटेकर, आदिती तांबे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांमधून मीरा पोंक्षे (प्रथम), ओमकार वेलोंडे (द्वितीय), निधी लंबाडे (तृतीय), रोजीना साबळे आणि रिद्धी चाळके (उत्तेजनार्थ) या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बांधावरचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के, वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत आणि स्पर्धा परीक्षकांच्या हस्ते संपन्न झाले. सर्व बक्षिसे ही श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण यांनी प्रायोजित केलेली होती. स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन प्रदीप पवार यांनी केले, आभार धीरज वाटेकर यांनी मानले.

बांधावरचे संमेलन अध्यक्ष प्रा. बारटक्के यांची मुलाखत
बालवाङ्मय, विनोदी कथा, ललित लेखनासाठी प्रसिद्ध असलेले साहित्यिक आणि बांधावरचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के यांची मुलाखत विनायक ओक आणि विलास महाडिक यांनी घेतली. ३५ वर्षे प्राध्यापक म्हणून काम, आकाशवाणीवरील असंख्य कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रमासाठी लेखन केलेल्या बारटक्के सरांची ही मुलाखत खूपच खुलली. या मुलाखतीतून बारटक्के सरांनी घरातल्या घरात सुरु केलेल्या वाचनालयाची माहितीही पुढे आली. बारटक्के यांचे आई-वडील शिक्षक होते. सहावीतल्या मुलांना ‘किशोर’ मासिकातील मधील एक धडा शिकवताना त्यांच्या आईला खूप आनंद झाला होता. कारण तो धडा बारटक्के सरांनी लिहिलेला होता. बारटक्के यांच्याकडे पाहुणचार घेण्यासाठी आलेल्या ‘गोनीदां’सह विविध मान्यवर साहित्यिकांच्या आठवणी या मुलाखतीतून उलगडत गेल्या.
निमंत्रित आणि स्थानिक कवींचे संमेलन
नाटककार-कवी कै. अप्पासाहेब जाधव ‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेतील विजेते कवी किरण वेताळ, डॉ. मनोज वराडे, सुधीर नागले, सारिका बिवलकर, मेधा लोवलेकर यांसह निमंत्रित कवी शशिकांत मोदी, मंदार ओक, प्रा. सोनाली खर्चे, जयश्री यादव, कुमार कोवळे, संजय गमरे, विजय कदम, केदार पाटणकर, बुद्धघोष गमरे, रविंद्र गुरव, शिवाजी शिंदे, ईश्वर हलगरे, संजय कदम, राजूभाई जाधव, प्रा. संगीता जोशी, सतीश कदम, आदी कवींनी आपल्या रचना सादर केल्या. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन राष्ट्रपाल सावंत यांनी केले. सर्व सहभागी कवींना मान्यवरांच्या हस्ते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातर्फे प्रमाणपत्र, अत्तरकुपी आणि लेखणी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ कवी, भाषा अभ्यासक अरुण इंगवले यांचेसह वाचनालयाच्या प्राची जोशी, मंजूषा चितळे, अमित ओक, गणेश सोनवणे यांचेसह ग्रंथपाल तेजश्री सोमण व कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले.




