
रत्नागिरी तालुक्यातील सांडेलावगणमध्ये चौघुले कंपनीविरोधात एल्गार
रत्नागिरी तालुक्यातील सांडेलावगण येथे चौघुले कंपनीच्या कथित मनमानी कारभारावरोधात स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. १९९३ साली रोजगार व विकासाच्या आश्वासनांवर कवडीमोल दरात जमिनी घेतल्यानंतर आता कंपनी शेतकर्यांच्या पूर्वापार वहिवाटीचे रस्ते व सीमांवर अतिक्रमण करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार प्रसाद सुरेश पाष्टे यांनी प्रांताधिकारी, रत्नागिरी यांना दिलेल्या निवेदनात कंपनीने अधिकृतरित्या कंपाऊंड वॉल उभारण्याचे काम सुरू केल्याचा उल्लेख केला आहे. या भिंतीमुळे पिढ्यानपिढ्या वापरात असलेल्या पाऊलवाटा आणि शासकीय नोंदीतील रस्ते बंद होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी वापरत असलेले रस्ते कंपनीने बंद करू नयेत.
जमिनीची अधिकृत मोजी न करता कंपनीने सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मोजणी पूर्ण होईपर्यंत बांधकाम थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासन आणि कंपनीकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप निवेदनात नमूद करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




