
सागरी किनारा मार्गावरील गाण्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त, रहिवाशांनी आळवला नाराजीचा सूर !
- सागरी किनारा मार्गावर विशेष संगीत पट्ट्या तयार करण्यात आल्या असून या मार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या संगीत रस्त्याला अर्थात मेलडी रोडला ब्रीच कॅण्डीच्या रहिवाशांनी विरोध केला आहे. सतत वाजणाऱ्या गाण्यांमुळे त्रास होत असल्याची तक्रार या रहिवासी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे व पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर अर्थात मुंबई कोस्टल रोडवर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे (रंब्लर्स) बसविण्यात आले आहेत. संगीत मार्गावरील (मेलोडी रोड) पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील ‘जय हो’ हे गाणे ऐकू येते. भारतातील हा पहिलाच प्रयोग असून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी त्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतील हा प्रयोग असून या प्रयोगाचे मुंबई महापालिकेनेही वाजतगाजत स्वागत केले. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र हा संगीत रस्ता तयार करण्यात आलेल्या भागातील रहिवाशांना सतत वाजणाऱ्या गाण्याचा त्रास होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.
असा आहे संगीत मार्ग
मुंबई किनारी रस्त्यावर नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर हा अभिनव प्रयोग साकारण्यात आला आहे. वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवरून ५०० मीटर पुढे संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्ट्यांवरून ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहन नेल्यास ‘जय हो’ या गीताची धून वाहनात बसून ऐकता येते. रस्त्याच्या पृष्ठभागावर ठराविक अंतरावर आणि विशिष्ट आकारात पट्टे (grooves / rumble strips) बसविण्यात आले आहेत. वाहन ठराविक वेगात या पट्ट्यांवरून गेल्यावर चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींवर ‘जय हो’ गाण्याची धून बसविण्यात आली आहे. हा अनुभव वाहनाच्या आत बसलेल्या प्रवाशांना स्पष्टपणे जाणवतो. भूमिगत बोगद्यात वाहन असतानाच चालकांना संगीतमार्गाची माहिती व्हावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ५०० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटर अंतर आधीच संगीत मार्गाबाबतचे सूचनाफलक लावले आहेत. ब्रीच कॅण्डी येथील रहिवाशी संघटनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या संगीत रस्त्याचा त्रास रहिवाशांना होत असल्याची तक्रार केली आहे. हे संगीत पट्टे बसवताना रहिवाशांना कल्पनाही देण्यात आली नाही. या आवाजाचा आम्हाला त्रास होतो. या परिसरात शाळा, रुग्णालय असून रात्रीच्या वेळी आवाज स्पष्ट ऐकू येतात. गाड्या सतत जात असतात आणि गाणे सतत वाजत असते. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो, असे मत संघटनेच्या नंदिता छाब्रीया यांनी व्यक्त केले.
या संगीत मार्गावर आवाज अतिशय कमी आहे, इमारतीतील रहिवाशांपर्यंत हा आवाज पोहोचेल इतका मोठा नाही, फक्त गाडीतील प्रवाशांनाच आवाज ऐकू येतो. पण रहिवाशांचे काही आक्षेप असतील, तर त्याची दखल घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. – राहुल शेवाळे, माजी खासदार




