
राज्यात उन्हाळ्याची चाहूल उन्हाचा चटका, उकाडा वाढला
कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३३ अंशांच्या वर गेल्याने उन्हाचा चटका वाढून राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
आजपासून (ता. १८) राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मंगळवारी (ता. १७) उत्तर प्रदेशच्या बांदा येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये केरळच्या कोची येथे देशातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये सोमवारी (ता. १६) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.मंगळवारी (ता. १७) धुळे येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका, उकाड्यात वाढ झाल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आज (ता. १८) राज्याच्या तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.




