रत्नागिरीत रंगणार पहिले ‘पक्षी मित्र संमेलन’; २२ फेब्रुवारीपासून पक्षीप्रेमींचा मेळा


​रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि येथील पक्षी वैविध्य जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व वन विभागाच्या वतीने आगामी २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘पक्षी मित्र संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
​रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला १६७ कि.मी.चा समुद्रकिनारा, सह्याद्रीच्या रांगा आणि दाट वनराई यामुळे हा जिल्हा पक्ष्यांसाठी नंदनवन ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी हे संमेलन होत आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे.
​भरगच्च कार्यक्रमांची आखणी
हॉटेल कोहिनूर येथे २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता नोंदणीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. यावेळी विविध तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये ‘जंगलाचे शेतकरी’ विषयावर प्रतीक मोरे, ‘सागरी आणि स्थलांतरीत पक्षी’ यावर विराज आठल्ये, तर ‘रत्नागिरीतील पक्षी विविधता’ या विषयावर निकिता शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पक्षी निरीक्षणासाठी काजरघाटी देवराई, सडामिऱ्या, नाचणे आणि कांदळवन अशा विविध ठिकाणी क्षेत्रीय भेटींचे आयोजन करण्यात आले आहे.
​जागतिक स्तरावर ‘इको-टूरिझम’ला मिळणार चालना
जिल्ह्यात धनेश (हॉर्नबिल) पक्षाच्या पाच प्रजातींसह एकूण ९९ हून अधिक पक्षांच्या प्रजाती आढळतात. हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी स्थलांतरित होतात. या संमेलनामुळे रत्नागिरीचे नाव जगभरातील पक्षी निरीक्षक, अभ्यासक आणि संशोधकांपर्यंत पोहोचणार असून, भविष्यात ‘पर्यावरणपूरक पक्षी पर्यटन’ (Ecotourism) ही जिल्ह्याची नवी ओळख बनेल, असा विश्वास जिल्हाधिकारी जिंदल यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या उपक्रमामुळे पर्यटनाला मोठी झेप घेता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button