चिपळूणचे सुपुत्र डॉ. यतीन जाधव यांची IMA महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या राज्य चेअरमनपदी निवड

चिपळूण : चिपळूणचे सुपुत्र व सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. यतीन जाधव यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), महाराष्ट्र राज्य यांच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या (Disaster Management Committee) राज्य चेअरमनपदी अत्यंत गौरवशाली निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती IMA महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी जाहीर केली आहे.
या समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी व मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील डॉक्टर व रुग्णांच्या हितासाठी तसेच आपत्तीच्या काळात प्रभावी वैद्यकीय सेवा देण्यासाठी ही समिती कार्य करणार आहे. समितीच्या कार्यक्षेत्राबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असून, आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.
डॉ. यतीन जाधव हे कोकणातील सुप्रसिद्ध स्प्रिंग क्लिनिकचे संचालक असून अपरांत मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक आहेत. त्यांनी जिल्ह्यातील अनेक नामवंत औद्योगिक आस्थापनांमध्ये औद्योगिक स्वास्थ्य चिकित्सक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. औद्योगिक स्वास्थ्य व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उत्तम जाणकार व प्रभावी व्यवस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे.

यापूर्वी त्यांनी IMA महाराष्ट्र राज्य औद्योगिक स्वास्थ्य समितीचे अध्यक्ष व समन्वयक ही पदे यशस्वीरित्या भूषवली आहेत. तसेच ते IMA चिपळूणचे अध्यक्ष आणि कोरोना टास्क फोर्सचे कोकण विभाग समन्वयक म्हणूनही कार्यरत होते.

डॉ. जाधव यांची सामाजिक व सांस्कृतिक कारकीर्दही तितकीच उल्लेखनीय आहे. कोकणच्या साहित्य व सांस्कृतिक इतिहासाचा मानदंड असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. सांज सोबत, एकता विकास मंच, आपलं चिपळूण, टच या सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अध्यक्ष, कार्याध्यक्ष व कोकण समन्वयक म्हणून प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. तसेच श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

वैद्यकीय व इतर विषयांवरील त्यांचे विचारप्रवर्तक लेख विविध शास्त्रीय व अन्य नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत. ते चिपळूण तालुका खो-खो असोसिएशन व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य, चिपळूण शाखेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक व आरोग्यविषयक प्रबोधन उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.
भारतामधील वैद्यकीय व्यावसायिकांची सर्वात मोठी व नामवंत संस्था असलेल्या IMA महाराष्ट्र राज्याने चिपळूणसारख्या छोट्या शहरातील लोकाभिमुख व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. यतीन जाधव यांची राज्य चेअरमनपदी निवड करून दिलेली संधी ही समस्त चिपळूणकरांसाठी गौरवाची बाब असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
……………………..
*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button