
कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन
गेल्या आठवड्यात बुधवारी, २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही समावेश होता.दरम्यान, या दु:खद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत आज विदीप जाधव यांच्या फलटण तालुक्यातील तरडगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी आणि मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत ‘कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे’ असा धीराचा शब्द देत सुनेत्रा पवार यांनी कुटुंबीयांना आधार दिला. या भावनिक प्रसंगामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर शनिवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सुनेत्रा पवार ह्या शपथविधीनंतर बारामती येथे परतल्या होत्या. त्यानंतर आज सुनेत्रा पवार यांनी कराड येथील प्रिती संगम येथे जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली.




