रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत तालुक्यातील गोळप येथे उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पातून जिल्हापरिषदेला ५० लाखांचे उत्पन्न


रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत तालुक्यातील गोळप येथे उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षभराच्या कालावधीत १३ लाख ९ हजार ४३० युनिट वीजनिर्मिती करण्यात येत आहे.
या वीजनिर्मितीतून जिल्हा परिषदेला सुमारे ४९ लाख ५१ हजार २३३ रुपये इतके आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींचे पथदीप तसेच प्राथमिक शाळा यांचे वीजबिल भागवण्यात येणार आहे.
गोळप येथे उभारण्यात आलेला १ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प आहे. स्वयंचलित सौरपॅनेल असणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. जिल्हा परिषदेच्या या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजनामधून निधी देण्यात आला असून, गोळप ग्रामपंचायतींच्या केवळ पाच गुंठे जागेत तो उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पातून वार्षिक १९ लाख युनिट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून वर्षभरात १३ लाख ९ हजार ४३० इतक्या युनिटची वीजनिर्मिती करण्यात यश आले आहे. या प्रकल्पामुळे गोळप ग्रामपंचायतीच्या वीजबिलापोटी १८ लाख आणि अन्य ग्रामपंचायतीचे सुमारे एक कोटी रुपये वाचणार आहेत. सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पथदीपांसाठी वर्षाला २२ लाख ८० हजार युनिट तर प्राथमिक आरोग्यकेंद्रासाठी १ लाख ५० हजार ७७३ युनिट असा वापर होतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पथदीपांच्या वीजबिलापोटी होणारा खर्च शून्यावर आणण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून सुरू आहे. गुहागर तालुक्यातील मौजे वरवेली येथे सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे.
दरम्यान, गोळप येथील सौरऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील एका कंपनीला विक्री करण्यात येत होती. त्यानंतर आता निर्माण होणारी वीज रत्नागिरीतील एका खासगी कंपनीला विकण्यात येणार असून, तसा करारही लवकरच करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button