
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे रामेश्वरवाडी येथील आंबा बागेत लागलेल्या भीषण वणव्यात एका कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे रामेश्वरवाडी येथील आंबा बागेत लागलेल्या भीषण वणव्यात एका कामगाराचा आगीत होरपल्याने व धुरामुळे श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार 11 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. भरत दिगंबर धारगळकर (५५, मूळ रा. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग; सध्या रा. नाखरे, रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. या भयावह घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामेश्वरवाडी येथील वैद्य यांच्या मालकीच्या आंबा बागेत काम सुरू असताना दुपारी तीनच्या सुमारास बागेच्या बाहेरील बाजूला अचानक आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे ही आग क्षणातच भडकत बागेच्या दिशेने वेगाने सरकू लागली. आगीमुळे बागेचा फडशा पडू नये, या उद्देशाने भरत धारगळकर यांनी प्राणाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी धाव घेतली.
मात्र, आगीच्या भीषण ज्वाळा आणि दाट धुराच्या विळख्यात ते अडकले. आगीच्या तीव्रतेमुळे ते गंभीररीत्या भाजले गेले, तर धुरामुळे गुदमरून ते जागीच कोसळले. काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला




