
भाजपा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष,आता थांबायला पाहिजे, नारायण राणेंकडून सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत?
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. दोन्ही मुले आता राजकारणात आहेत, त्यामुळे मला माझा व्यवसाय पाहायचा आहे, असं नारायण राणे म्हणाले. कोकणात घेतलेल्या भव्य सभेत ते बोलत होते. तसंच, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधतानाही या वाक्यांचा पुनरुच्चार केला.
नारायण राणे म्हणाले, “माझ्या प्रवासात कोणाची मदत नाही. बऱ्याच जणांनी अडवायचंच काम केलं. आज नाही बोलणार, बोललो तर आत्मचरित्रात बोलेन. बरीच वर्षे एकाच पदावर राहिलो असतो. पण कारस्थान होत गेलं. तेव्हाही अडचण आली मला, आताही आली, पण मी आता ठरवलं आहे की आता पूर्णविराम द्यायचा. आता घरी बसायचं. त्यांना कशाला त्रास, कटकारस्थान करायला. त्यापेक्षा घरी बसू. दोन्ही मुले चांगली आहे. त्यांना सांगितलं नांदा सौख्य भरे. चांगलं काम करा, नाव कमवा. दोघेही अतिशय चांगलं काम करत आहेत.
पुढे नारायण राणे म्हणाले, “भाजपाचे (तत्कालीन) अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेबांकडे मी वेळ मागितला. तुम्ही राज्यसभा, लोकसभा देऊ नका, असं म्हणालो होतो. मला माझा व्यवसाय करायचा आहे. पण त्यांनी उत्तर दिलं की राणेजी हम आपको छोडने वाला नही है. मी म्हणालो साहेब दोन्ही मुले राजकारणात आले, माझा व्यवसाय आहे. पण ते म्हणाले मुझे मालूम नहीं, हम छोडनेवाला नही.”
या सभेनंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. राजकीय निवृत्तीविषयी पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “आता थांबायला पाहिजे. काम करत राहावं असं नाही. शेवटी शरीर आहे. त्यामुळे माणसाला वाटतं त्यामुळे थांबायला पाहिजे. दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यानंतर थोडा व्यवसायालाही वेळ दिला पाहिजे.”
भाजपा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष
“माझ्या आयुष्यातील भाजपा शेवटचा पक्ष आहे. मात्र माझा स्वभाव आहे, जगेन तर मानाने, स्वाभिमानाने जगेन. मला पदाची अपेक्षा आणि स्वार्थ नाही. इश्वराने मला जन्माला पदासाठी घातलं नाही. मी एकाही पदाचा दुरुपयोग केला नाही”, असंही नारायण राणे म्हणाले.




