पोलीस क्रीडा स्पर्धा- 2025 या भव्य क्रीडा महोत्सवाचे सोमवारी ८ डिसेंबर रोजी दापोली येथे शुभारंभ


कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा- 2025 या भव्य क्रीडा महोत्सवाचे सोमवारी ८ डिसेंबर रोजी दापोली पोलीस ठाणे हद्दीमधील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेकरिता कोकण परिक्षेत्रामधील नवी मुंबई, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील तसेच पालघर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार खेळाडू यांचा उत्साहपूर्ण सहभाग असणार आहे.

पोलीस दलातील खेळाडूंमध्ये तंदुरुस्ती, शिस्त, टीम स्पिरिट आणि सौहार्द वाढविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून कोंकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, कबड्डी यांसारख्या विविध खेळांचा समावेश आहे तसेच या या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड आगामी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा साठी करण्यात येणार आहे.

या कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा- 2025 चे उद्घाटन मा. श्री. डॉ. संजय भावे, कुलगुरु डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली व मा. श्री. मनुज जिंदल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी जिल्हा यांच्या शुभहस्ते दि. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा होणार असून या उद्घाटन सोहळ्याची प्रमुख उपस्थिती जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी. बी. महामुनी यांची राहणार आहे.

या स्पर्धेसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. सर्व सहभागी खेळाडूंची सुरक्षितता, सर्व संघांसाठी निवास, वाहतूक व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पिण्याचे पाणी केंद्रे आणि प्रथमोपचार केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. तसेच स्पर्धा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी रत्नागिरी पोलीस दलाकडून पुरेसा बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

या कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा- 2025 करिता एकूण 1220 पोलीस अधिकारी व अंमलदार खेळाडू उपस्थित राहणार असून विविध स्पर्धांद्वारे पोलीस दलाची क्रीडा कौशल्ये, शिस्त आणि टीमवर्कची झलक पाहायला मिळणार आहे.

रत्नागिरी पोलीस दलातर्फे रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व नागरिकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येत असून आपली उपस्थिति प्रार्थनिय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button