विशेष लेख

क्रांतिसूर्य महात्मा फुले: विवेक, समता आणि सामाजिक क्रांतीचे दिशादर्शक



क्रांतीबा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याकडे वळून पाहताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे—फुले दांपत्य हे केवळ एका कालखंडापुरते मर्यादित समाजसुधारक नव्हते; तर ते नव्या मानवकेंद्रित युगाचे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि समतावादी मूल्यांचे आद्य प्रणेते होते. बुद्धीप्रामाण्यवाद, निर्भय कृतीशीलता आणि सामाजिक समतेवरील अढळ निष्ठा हा त्यांच्या समग्र जीवनकार्याचा पाया होता. त्यांनी प्रस्थापित शब्दप्रामाण्यवाद आणि ग्रंथप्रामाण्यवादाला स्पष्ट नकार देत, शतकानुशतके चालत आलेल्या विषमतेला आणि शोषक व्यवस्थेला पर्यायी मानवकेंद्रित कृतीशीलतेचे उत्तर दिले. आज आपल्या संविधानात ज्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेचा पाया आहे, त्या संवैधानिक मूल्यांचा हुंकार दीड शतकापूर्वी या महामानवाने आपल्या कार्यातून फुंकला होता.
भारतीय समाजव्यवस्थेच्या अंधकारमय कालखंडात ज्ञानाचा आणि सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ उभारणारे युगपुरुष म्हणजे महात्मा जोतीराव फुले. फुले हे केवळ एका व्यक्तीचे नाव नाही; तर या देशात उदयास आलेल्या सामाजिक क्रांतीचे, विवेकाच्या उजेडाचे, मानवमुक्तीच्या आणि समतेच्या अविश्रांत लढ्याचे ते सजीव प्रतीक आहेत. त्यांचे विचार, कार्य आणि कृतीशीलता आजही मानवी मूल्यांचा पाया रचण्यासाठी तेवढीच ज्वलंत प्रेरणा देतात.
कर्तृत्व आणि कार्याची गुणवत्ता
महात्मा फुले यांचे व्यक्तिमत्त्व केवळ वैचारिक मांडणीपुरते मर्यादित नव्हते, तर ते कृतीशील सुधारक होते. व्यावसायिक जीवनातही त्यांनी सचोटी, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट दर्जाचे आदर्श घालून दिले. बांधकामासारख्या क्षेत्रात काम करताना ते कसे टिकाऊ, दर्जेदार आणि प्रामाणिक असावे, याचे प्रत्यक्ष वस्तुपाठ त्यांनी जगापुढे उभे केले. त्यांच्या प्रत्येक कृतीतून समाजोपयोगी मूल्ये आणि पारदर्शकता झळकत होती.
सत्यशोधक समाज: विवेकाचा आणि विज्ञानाचा मार्ग
महात्मा फुल्यांच्या विचारविश्वात २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापन झालेल्या ‘सत्यशोधक समाजा’ला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ही केवळ एक संघटना नव्हती, तर ती सत्याचा शोध घेणारी, विज्ञाननिष्ठा जपणारी आणि मानवी मनाला अनिष्ठ रूढी, अंधश्रद्धा व कर्मकांडांच्या दास्यातून मुक्त करणारी एक प्रखर विचारचळवळ होती.
या चळवळीत फुल्यांनी मांडलेली “निर्मिक” ही संकल्पना अद्वितीय होती. ही संकल्पना कोणत्याही काल्पनिक देव-देवतांपेक्षा निसर्गाच्या मूळ निर्मितीक्षमतेला आणि त्याच्या नियंत्रणक्षमतेला सन्मान देणारी होती. त्यांच्या दृष्टीने ‘सत्यधर्म’ म्हणजेच खरी माणुसकी, आत्मिक चांगुलपणा, सर्वसमावेशक सामाजिक बंधुभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन! विषमतेवर आधारलेल्या तत्कालीन व्यवस्थेला सुरुंग लावून प्रत्येक मानवाला आत्मसन्मान मिळवून देणे हाच यामागील मूळ हेतू होता.
सामाजिक न्यायाची अखंड परंपरा
महात्मा फुल्यांच्या समग्र जीवनकार्याचा परिपाक म्हणजे समता, बंधुता, सौहार्द, मानवता आणि विवेक यांची अभेद्य पायाभरणी. महाराष्ट्रात आणि देशात पुढे उभी राहिलेली सामाजिक न्यायाची चळवळ महात्मा फुल्यांच्या विचारांच्या बळावरच उभी राहिली:
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आणि आरक्षणाच्या रूपाने समतेसाठी जे ऐतिहासिक पाऊल उचलले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी हक्क आणि सामाजिक लोकशाहीची जी परंपरा पुढे नेली—
त्या विशाल वटवृक्षाची मूळे महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांमध्येच खोलवर रुजलेली आहेत.
आजच्या काळातील औचित्य
महात्मा फुले यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ भूतकाळातील इतिहासाला वाहिलेली औपचारिक आदरांजली नव्हे; तर ती आपल्या वर्तमान सामाजिक कर्तव्याची आणि जबाबदारीची कठोर जाणीव आहे. आज जेव्हा जेव्हा आपण समाजात न्याय, समता, स्त्री-पुरुष समानता आणि मानवी हक्कांचा आग्रह धरतो, तेव्हा त्या प्रत्येक आग्रहामागे महात्मा फुल्यांचे विचार मार्गदर्शक ठरतात.
महात्मा फुले हे कालच्या सुधारणेपुरते मर्यादित नव्हते, तर ते आजच्या आणि उद्याच्याही पुरोगामी समाजाच्या वाटचालीचे दीपस्तंभ आहेत. त्यांचे विचार आचरणात आणून विवेकवादी आणि समताधिष्ठित समाज घडवणे, हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल.
– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button