
एफडीएच्या नोटिशीविरुद्ध अभिनेता अजय देवगण मुंबई उच्च न्यायालयात ! ‘विमल इलाईची’ जाहिरातीत झळकल्याचे प्रकरण!
मुंबई : ‘विमल इलायची’ची जाहिरात केल्याप्रकरणी राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीविरोधात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
एफडीएद्वारे अजय याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीत, ‘विमल इलायची’ च्या जाहिराती ‘विमल पान मसाला’ या महाराष्ट्रात बंदी घातलेल्या च्युएबल उत्पादनाच्या सरोगेट जाहिरातीसाठी पैसे देतात, असा आरोप करण्यात आला आहे. एफडीएने याच जाहितीत अजयसह झळकलेला अभिनेता शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांनाही अशाच प्रकारची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अजय याने याचिकेद्वारे एफडीए नियमांमधील तरतुदींच्या घटनात्मकतेला आव्हान दिले आहे. तसेच, एफडीएने बजावलेली ही नोटीस निर्मात्या कंपनीला न देता त्यात काम केले म्हणून थेट आपल्याला मनमानी पद्धतीने बजावण्यात आल्याचा दावा केला आहे. याआधी, पीबी ॲग्रो या उत्पादनाच्या उत्पादकाने ऑगस्टमध्ये नोटीस रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती आणि त्यात प्रादेशिक अधिकार क्षेत्राचा अभाव असल्याचे नमूद केले होते. त्याचवेळी, महाराष्ट्रातील कथित कारवायांबाबत मुंबई एफडीएने केलेल्या कृतींशी संबंधित वादांसाठी तेथील न्यायालयेच योग्य मंच असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या पार्श्वभूमीवर, अजय याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.




