लांजा डीवायएसपी सुरेश कदम यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित


लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील मलबार हिल येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

१९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झालेल्या कदम यांनी मुंबई, कोल्हापूर, गोंदिया, ठाणे, पालघर, पुणे आणि रत्नागिरी येथे सेवा बजावली. जयगड येथे कार्यरत असताना जेएसडब्ल्यू प्रकल्प आणि आंग्रे पोर्टच्या उभारणीदरम्यानची आंदोलने शांततेत हाताळण्यासह जेएसडब्ल्यू कॉलनीतील बॉम्बस्फोटाचा तपास त्यांनी यशस्वीपणे केला. गोंदिया येथील नक्षलग्रस्त भागातील सेवेबद्दल त्यांना यापूर्वी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि विशेष सेवा पदक मिळाले आहे.

रत्नागिरी ग्रामीणमध्ये कार्यरत असताना गँगवॉर आणि उद्योजक दीपक गद्रे खंडणी प्रकरणाच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लांजा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना केतकर ज्वेलर्स अपहरण प्रकरण आणि आंबा घाटातील दरोड्याच्या तपासातील कामगिरीचीही दखल घेण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button